पुणे वसंत व्याख्यानमाला २१ एप्रिलपासून सुरु


शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष; सुमेधा चिथडे यांचा रानडे पुरस्कार

पुणे :
वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने सोमवार दि.21 एप्रिलपासून वसंत व्याख्यानमालेला सुरूवात होत आहे. व्याख्यानमालेचे यंदा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. ही व्याख्यानमाला 20 मे पर्यंत दररोज सायंकाळी 6 वाजता टिळक स्मारक मंदिरात होईल. व्याख्यानमाला विनामूल्य आणि सर्वांसाठी खुली आहे. वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक व प्रमुख कार्यवाह डॉ. गीताली टिळक यांनी ही माहिती दिली.
या ज्ञान सत्रात राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्‍वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. शंकर अभ्यंकर, हेरंब कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका डॉ. निलीमा गुंडी, रंगभूमीचे अभ्यासक प्रसाद वनारसे, ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे, मंगला गोडबोले, डॉ. आदित्य अभ्यंकर, सुलभा तेरणीकर कर्नल अनिल आठले, डॉ. वर्षा तोडमल यांची व्याख्याने होणार आहेत. व्याख्यानमालेत साहित्य, समाजकारण, संस्कृती, इतिहास, कायदा, जागतिक रंगभूमी, चित्रपट, आर्थिक, आरोग्य आदी विषयांवर विविध ज्येष्ठांचे विचार श्रोत्यांना ऐकता येणार आहेत.
सिर्फ संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग सैनिक, शहिद सैनिकांच्या पत्नीचे व कुंटूंबाचे पुनर्वसन व कल्याण तसेच तरूणांना सशस्त्र दलात सामील होण्याची प्रेरणा देत असलेल्या सुमेधा चिथडे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून न्या. महादेव गोविंद रानडे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते 29 एप्रिल रोजी न्या. रानडे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पुरस्कार वितरणानंतर सुमेधा चिथडे यांचे ‘राष्ट्राय स्वाहा इदं न मम’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. हे न्या. रानडे स्मृती व्याख्यान आहे.

दि. 21 एप्रिल रोजी डॉ. राजा दीक्षित हे ‘लोकमान्यांचे योगदान: ऐतिहासिक मिमांसा’ या विषयावर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतील. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या व्याख्यानाने 20 मे रोजी या व्याख्यानमालेचा समारोप होईल. दि. 22 एप्रिल रोजी प्रसिद्ध लेखिका डॉ. वर्षा तोडमल या ‘आरोग्य : शरीराचे आणि मनाचे’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. 30 एप्रिल रोजी जयंतराव टिळक स्मृती व्याख्यानाचे पुष्प सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार गुंफणार आहेत. 24 एप्रिल रोजी ‘न्या. रानडे, लो. टिळक तर्कतीर्थ : धर्म आणि सामाजिक सुधारणा’ या विषयावर डॉ. सुनिलकुमार लवटे विचार मांडणार आहेत.

Advertisement

27 एप्रिल रोजी वि. गो. साठे स्मृती व्याख्यान आहे. या व्याख्यानाचे पुष्प ‘लोकप्रिय चित्रपट आणि लोकप्रिय संगीत’ या विषयावर सुलभा तेरणीकर गुंफणार आहे. 28 एप्रिल रोजी बाजीराव पेशवे स्मृती व्याख्यान आहे. हे व्याख्यान डॉ. सदानंद मोरे देणार आहेत. ‘मराठ्यांचे उपेक्षित साम्राज्य’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. 1 मे रोजी दत्तो वामन पोतदार स्मृती व्याख्यान आहे. डॉ. श्रद्धा कुंभोजकर ‘दीडशे वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र’ या विषयावर व्याख्यान देतील. 7 मे रोजी गौरी टिळक स्मृती व्याख्यानात ‘मेंदूचा पासवर्ड’ या विषयावर डॉ. श्रुती पानसे आपले विचार मांडणार आहेत. 8 मे रोजी सदा डुंबरे स्मृती व्याख्यानात निवृत्त कर्नल. अनिल आठले हे ‘भारत-चीन सीमा विवाद, सत्य आणि मिथक’ या विषयावर बोलणार आहेत. 12 मे रोजी डॉ. संप्रसाद विनोद हे ‘योग-एक परिपूर्ण जीवनशैली’ या विषयावर बोलतील, हे अद्वैत बडवे स्मृती व्याख्यान असेल. 13 मे रोजी सारंग साठे स्मृती व्याख्यान आहे. हे व्याख्यान डॉ. सुवर्णा जोशी ‘साथीच्या रोगाचे निदान आणि माझा प्रवास ’ या विषयावर देतील. 14 मे रोजी पुनमचंद सुराणा स्मृती व्याख्यान आहे. या व्याख्यानाचे पुष्प जयश्री काळे ‘विंदादर्शन’ या विषयावर गुंफणार आहेत. 17 मे रोजी सुंदराबाई सुराणा स्मृती व्याख्यान आहे. या व्याख्याचे पुष्प ‘भाषा, कविता आणि संस्कृती’ या विषयावर डॉ. निलीमा गुंडी आपले विचार मांडणार आहेत.

या खेरीज अभिनेते शरद पोंक्षे, मुकुंद फडके, डॉ. संजय उपाध्ये, महेंद्र गोखले, डॉ. मेधा सामंत, डॉ. प्रा. चैतन्य आठले, रणजित गाडगीळ, डॉ. दिलीप पटवर्धन आणि संतोष जोशी यांची विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत. वसंत व्याख्यानमालेतील सर्व व्याख्याने ज्ञान सत्राच्या समारोपानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मास-कॉम विभाग, यूट्यूब चॅनेलद्वारे काही कालावधीने प्रसारित केली जातील. दि. 1 मे रोजी सुट्टी असल्याने या दिवशीचे व्याख्यान त्याच दिवशी https://youtube.com/@TMVMassCommunication या यूट्यूब चॅनेल लिंकवर प्रसारित होईल. या व्याख्यानमालेला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रमुख प्रायोजकत्व लाभले आहे, असेही डॉ. गीताली टिळक यांनी सांगितले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!