कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी किमान १५ ठार
पवित्र स्नानाच्या जागी लोकांची गर्दी झाल्यामुळे दुर्घटना
वाराणसी
प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या जागी अचानक निर्माण झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. या घटनेत १५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.येथील त्रिवेणी संगमाजवळ पवित्र स्नानाच्या जागी लोकांची गर्दी झाल्यामुळे अशी स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेले लोक आणि आरोग्यसेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या घटनेत किमान १५ लोकांचे प्राण गेले असल्याची शक्यता बीबीसीकडे वर्तवली आहे.
मात्र प्रशासनाने अद्याप किती लोक मृत्युमुखी पडले किंवा जखमी झाले याची आकडेवारी स्पष्ट केलेली नाही.प्रयागराज येथील एका डॉक्टरांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर या घटनेत किमान 15 लोक मृत्युमुखी पडल्याचं आणि अनेक लोक जखमी झाल्याचं सांगितलं, अशी माहिती एएफपी वृत्तसंस्थेने दिली आहे. प्रशासनाने अद्याप कोणाचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलेलं नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करून लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.पंतप्रधान मोदींनी लिहिलं, “प्रयागराज येथील महाकुंभात झालेला अपघात दुःखद आहे. यामध्ये ज्या भाविकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे. यासोबतच, सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री योगीजींशी बोललो आहे आणि मी सतत राज्य सरकारच्या संपर्कात आहे”
आज मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नान होते. त्यावेळी ही गर्दी जमा झाली होती.प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभमेळ्याची सुरूवात झाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातून आणि परदेशातून लाखो भाविक प्रयागराजला गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या संगमावर येत आहेत.
सरकारचा अंदाज आहे की, यावर्षीच्या महाकुंभमेळ्याला 40 कोटीहून अधिक लोक भेट देणार आहेत.

