डॉ. श्रीपाल सबनीस हृदयाला भिडणारे व्यक्तिमत्व
गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा प्रसंगी चंद्रकांत दळवी यांचे उद्गार
पुणे
माणूस जितका मोठा होतो तितका तो सामान्यांना अनुपलब्ध होतो, मात्र डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या बाबतीत मात्र उलटे झाले असून ते सर्व सामान्यांसाठी उपलब्ध असतात. डॉ. श्रीपाल सबनीस हे प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारे व्यक्तिमत्व आहे, असे प्रतिपादन भा.प्र. से. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी केले.
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सातारा आयोजित यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित तसेच शिरीष चिटणीस संपादित डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विवेकनिष्ठ प्रज्ञावंत डॉ. श्रीपाल सबनीस या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते येथील नवी पेठ, पत्रकार भवन येथे पार पडला त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षण तज्ञ अ. ल. देशमुख हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्याम देशपांडे, दैनिक केसरी या वृत्तपत्राचे सहसंपादक रामदास नेहुलकर, संस्कार मंदिर संस्थेचे कला वाणिज्य महाविद्यालय, वारजे माळवाडी सहयोगी प्राध्यापक स्वप्निल गायकवाड, डॉ. सबनीस यांच्या पत्नी ललिता सबनीस, शिरीष चिटणीस, प्रा. रूपाली अवचरे, निखिल लंभाते आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत दळवी पुढे म्हणाले, सबनीस सरांनी ८९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर सव्वा वर्षात ३८० कार्यक्रम केले. सरांनी ६३ वैचारिक ग्रंथ लिहिलेले आहेत. तसेच सरांना एकूण पस्तीस पुरस्कार मिळालेले आहेत. साहित्य संमेलन हा त्यांचा जगण्याचा भाग आहे. सबनीस सर वादळी व्यक्तिमत्व असून खूपच अप्रतिम असे ते काम करत आहेत. सबनीस सरांचे पुस्तक लिहिणे हाच त्यांचा खरा सन्मान आहे. यामध्ये संपादक शिरीष चिटणीस व त्यांची दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था साहित्य क्षेत्राच्या पाठीमागे उभी राहते हे निश्चितच कौतुकास्पद आहे. यशोदीप पब्लिकेशन्स पुणे यांचाही खूप मोठा वाटा आहे.
शिरीष चिटणीस म्हणाले, दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था कोणत्याही जाहिरातीसाठी खर्च करत नाही. जाहिरातीचा खर्च आम्ही कार्यक्रमासाठी करतो. आपल्या प्रबोधनाने, लेखनाने, वक्तृत्वाने प्रसिद्ध असलेले डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या आत्मचरित्रांमधून समाजाची प्रबोधन होण्याचे काम होत असते. आपण जे विचार करतो त्याला वेगवेगळे पैलू असतात. डॉ. सबनीस यांचे तरुण पिढी विषयी काय विचार आहेत हे गौरव ग्रंथाच्या माध्यमातून समोर येईल.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ईश्वराला मानणारी सातशे कोटी लोक आहेत. तसेच दुहेरी निष्ठा ठेवणारी माणसे जगामध्ये भरपूर आहेत. मी मार्क्सवादी, कम्युनिस्ट होतो. नंतर आंबेडकरवादी झालो. नंतर समाजवादी झालो. मी चांगुलपणाची बेरीज करायला शिकलोय. सर्व धर्माच्या चांगुलपणाची बेरीज करून त्यामध्येच मी रमलेलो आहे. मला जगण्याची प्रेरणा तुमच्या ऋणाने मला दिलेली आहे. संचिताची बेरीज करण्यामध्ये मला रस आहे. सामान्यातल्या सामान्यांमध्ये जे समाधान आहे ते मोठ्यात नाही,
कार्यक्रमास रावसाहेब पवार, जे. पी. देसाई, माधव राजगुरू, शिरीष रायरीकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार स्वप्निल पोरे यांनी केले. आभार शिरीष चिटणीस यांनी मानले.

