समाज पत्रकारांबाबत किती संवेदनशील हा खरा प्रश्न


खानापूर येथे आजच्या पत्रकारितेपुढील आव्हाने’ विषयावर परिसंवाद

सातारा
पत्रकारांकडून समाज खूप अपेक्षा बाळगतो, पण समाज त्यांच्याविषयी किती संवेदनशील असतो हाच खरा प्रश्न आहे. याच समाजाचे प्रश्न निर्भिडपणे मांडताना प्रसंगी पत्रकारांवर हल्ल्याच्या घटना घडतात. अशावेळी समाजाने पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, असा मतप्रवाह विसाव्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनातील परिसंवादात व्यक्त झाला.
सीमाभागातील खानापूर (जि. बेळगाव) येथे सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमी व खानापूर येथील शिवस्वराज जनकल्याण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार विलास अध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली ‘आजच्या पत्रकारितेपुढील आव्हाने’ विषयावरील हा परिसंवाद सर्वांनाच अंतर्मुख व्हायला लावणारा ठरला. परिसंवादात सातारा येथील मुक्त पत्रकार राजीव मुळ्ये, सीमाभागातील पत्रकार प्रसाद प्रभू, वासुदेव चौगुले यांनी आपले विचार मांडले.
समाजाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये झालेले द्विध्रुवीकरण, सरसकटीकरण यापासून स्वत:ला दूर ठेवणे हे आजचे प्रमुख आव्हान असल्याचे पत्रकार राजीव मुळ्ये यांनी नमूद केले. घटनांच्या सर्व पैलूंचा विचार करणे आज पत्रकारांनाही शक्य होत नाही असा अनुभव आहे. काय बोलले, यापेक्षा कोण बोलले याला अधिक महत्त्व येणे समाजहिताचे नाही. रेडिमेड संकल्पना आणि प्रतिमा समाजात झिरपत आहेत आणि माध्यमे त्यास खतपाणी घालत आहेत. प्रश्न पडणे आणि विचारणे कमी होत चालले आहे. ही धूप रोखण्याचे आव्हान आजमितीस पत्रकारितेसमोर आहे अशी भूमिका त्यांनी मांडली.
आपल्या स्वतंत्र भूमिकेऐवजी मालकांची जी भूमिका असेल त्याप्रमाणे काम करावे लागणे हेही एक आव्हानच आहे. त्याचप्रमाणे पत्रकारितेचा किती वकूब आहे त्यापेक्षाही व्यवसाय किती देईल यावर पत्रकारांचे भवितव्य ठरते आहे. परिणामी बातमीमागची बातमी शोधणारे पत्रकार कमी होत आहेत असे परखड भाष्य प्रसाद प्रभू यांनी यावेळी केले.
इलेक्ट्रॉनिक माध्यमे आल्यानंतर मुद्रित माध्यमे अडचणीत येतील अशी भीती होती. परंतु सडेतोड संपादकीय आणि विश्वासार्हतेच्या बळावर वृत्तपत्रांनी आपला दबदबा राखला असे वासुदेव चौगुले म्हणाले. सर्व शासकीय परिपत्रके कानडीत असतात, त्यांचा बिनचूक अन्वयार्थ लावणे सीमाभागातील मराठी पत्रकारांसाठी आव्हानात्मकच असते. त्याचप्रमाणे येथील पत्रकारांना कर्नाटकाप्रमाणेच शेजारच्या गोव्याचे मंत्रिमंडळ माहीत असावे लागते असे त्यांनी सांगितले. गुंफण परिवाराशी आपले जुने ऋणानुबंध असल्याचे सांगतानाच त्यांनी श्रीमंत उदयसिंह सरदेसाई यांच्या कार्याचाही गौरवपूर्ण उल्लेख केला.
सत्ताधार्‍यांविरोधात लिहिणार्‍या पत्रकारांची गळचेपी होत आहे. समाज माध्यमांवर बातमीच्या नावाखाली वाटेल ते खोटे पसरविले जात आहे. अलीकडच्या काळात सत्ताधार्‍यांना प्रश्न विचारायचे सोडून विरोधकांनाच प्रश्न विचारले जात आहेत हे समर्थनीय नाही असे मत विलास अध्यापक यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी ज्येष्ठ वकील अरुण सरदेसाई व मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Advertisement

 

फोटो कॅप्शन

परिसंवादात बोलताना पत्रकार राजीव मुळ्ये, व्यासपीठावर वासुदेव चौगुले, नारायण कापोलकर, विलास अध्यापक, प्रसाद प्रभू आदी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!