ध्येयानुसार वाटचाल केल्यास सफलता मिळते :डॉ.सोनम जाधव
बालकुमार साहित्य संमेलन लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर येथे संपन्न
सातारा
विद्यार्थ्यांनी आपणासमोर नेहमी उच्च ध्येय ठेवले पाहिजे, ठेवलेल्या ध्येयानुसार परिश्रमपूर्वक वाटचाल केल्यास आयुष्यामध्ये निश्चितच सफलता मिळते, असे प्रतिपादन डॉ. सोनम जाधव यांनी केले.
येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेच्या वतीने व अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था,पुणे शाखा सातारा आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था, सातारा यांच्या वतीने आयोजित ९ वे एक दिवसीय बालकुमार साहित्य संमेलन लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर एम. आय. डी. सी. कोडोली,सातारा येथे संपन्न झाले, या साहित्य संमेलनात विद्यालयाची माजी विद्यार्थिनी डॉ. सोनम जाधव संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अ. भा. म. बा. सा. संस्था पुणे, शाखा साताराच्या अध्यक्षा शिल्पा चिटणीस, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संचालक सतीश पवार हे होते. यावेळी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका ज्योती नलवडे, अ. भा. म. बा. सा. संस्था पुणे, शाखा सातारा सहकार्यवाह नंदा पवार, कोषाध्यक्ष शशिकांत जमदाडे, कार्यवाह भगवान जाधव, उपाध्यक्ष अभिजीत वाईकर, अनिल सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सोनम जाधव पुढे म्हणाल्या, इयत्ता चौथी पासून माझे या शाळेत शिक्षण सुरू झाले. मला अभ्यासासोबत खेळायची ही आवड होती. मी माध्यमिक शिक्षण घेत असताना कबड्डी या खेळाची कॅप्टन होते. मुलांनी विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला पाहिजे, त्यामुळे मुलांचा कलागुण विकसित होत जातो. छोटे छोटे क्षण असतात त्या माध्यमातून आपणाला उस्फूर्तता मिळते. मी मोठेपणी डॉक्टर व्हायचे हे लहानपणीच ठरवले होते. व त्यानुसारच माझी वाटचाल सुरू होती. होमिओपॅथिक व आयुर्वेदिक हे जुने शास्त्र असून विविध रोगावर उपचार करण्यासाठी ती खूप उपयुक्त अशी पद्धती आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये जे नकळत करत जातो त्याचा पुढे आपणाला खूपच फायदा होतो.
शिरीष चिटणीस म्हणाले, गेल्या तीन वर्षापासून आपण बालकुमार साहित्य संमेलनासारखा एक वेगळा प्रयोग करत आहोत. या संमेलनामुळे विद्यार्थ्यांमधील गुणवैशिष्ट्यांना चालना मिळते. सध्या अभ्यासाबरोबरच गीत गायन, क्रीडा प्रकार, शिल्पकला इत्यादी कलांना महत्त्व प्राप्त झालेले आहे. येथे सादर केलेल्या कलागुणांमुळे तुम्हाला पुढील आयुष्यात संधी प्राप्त होणार आहे.
शिल्पा चिटणीस म्हणाल्या, शाळेत जी संधी मिळते त्याचा वापर करून आपल्यातल्या कला विद्यार्थ्यांनी वाढवल्या पाहिजेत.डॉक्टर सोनम जाधव यांच्याप्रमाणेच मी सुद्धा समोरच्या मुलांना मोठे झाल्यानंतर काहीतरी मार्गदर्शन करणार हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. चित्रकला, वक्तृत्व, संगीत, नृत्य, नाटक या कला अभ्यासाबरोबरच आपण वाढविल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.
या बालकुमार साहित्य संमेलनात काव्यवाचन, श्लोक पठण, बडबड गीत, कथाकथन विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास बाळकृष्ण इंगळे, हणमंत खुडे, चंद्रकांत देवगड, विजय गव्हाळे, सुजाता शिंदे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती नलवडे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर मोहटकर यांनी केले. आभार संदीप जाधव यांनी मानले.

