प्रितीसंगमावर काका पुतणे आमने सामने
रोहित यांनी केला अजितदादांना खाली वाकून नमस्कार
मुंबई
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा एकहाती विजय झाला, तर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला.यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतीसंगमावर अनेक नेतेमंडळींसह पवारांच्या शरद पवार, अजित पवार आणि रोहित पवार या तीन पिढ्या अभिवादन करण्यासाठी उपस्थित होत्या.यावेळी प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार आमने-सामने आले. त्यावेळी काका अजित पवारांना पुतण्या रोहित पवारांनी वाकून नमस्कार केला. यावेळी अजित पवारांनी रोहित पवारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत, ऑल द बेस्टही म्हटलं.
काका-पुतण्याच्या भेटीनंतर आणि त्यावेळीच्या दोघांमधील संवादानंतर राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. रोहित पवार समोर आल्यानंतर अजित पवारांनी त्यांना हस्तालोंदन केलं आणि त्यांना काकाच्या पाया पड, असं म्हणत खाली वाकून नमस्कार करण्यासाठी आग्रह केला. रोहित पवारांनी क्षणाचाही विलंब न लावता, अजित पवारांना खाली वाकून नमस्कार केला. त्यानंतर रोहित पवारांना निवडून आल्याबद्दल अजित पवारांनी अभिनंदन केलं आणि थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं विचार कर… असा टोलाही अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला.
या संवादानंतर दोघेही निघून गेले…
रोहित पवार म्हणाले की, “अजित पवार माझे काका आहेत, म्हणून मी पाया पडलो. शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणे माझी जबाबदारी आहे. माझी सभा झाली असती, तर अडचण झाली असती..असं विधान देखील अजित पवारांनी केलं. यावर रोहित पवारांना विचारले असता नक्कीच अजित पवारांनी सभा झाली असती तर वर-खाली झालं असतं, उलटंही होऊ शकलं असतं. पण ते बारामतीमध्ये अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. शेवटी अजित पवार मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. त्यांचे आमदार देखील मोठ्या प्रमाणात निवडून आले आहे. चांगली गोष्ट आहे, मी त्यांचे अभिनंदन देखील केलं, असं रोहित पवार यांनी सांगितले

