मतदान हा लोकशाहीचा सन्मान : यशेंद्र क्षीरसागर
“मतदान आणि नागरिक” या विषयावर विशेष व्याख्यान
कोरेगाव
मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. तथापि त्याहूनही अधिक मतदान करणे म्हणजे लोकशाही आणि राज्यघटनेचा सन्मान आहे. हा सन्मान करण्याची सुवर्णसंधी नागरिकांनी कधीही सोडू नये आणि आठवणीने मतदान करावे. 20 नोव्हेंबर रोजी सर्वांनी मतदानाचा अधिकार विधानसभेसाठी बजावावा, असे आवाहन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या मतदान जनजागृती पथकाचे प्रमुख यशेंद्र क्षीरसागर यांनी केले. येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये “मतदान आणि नागरिक” या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते.
यावेळी केंद्रप्रमुख अनिता सूर्यवंशी,मुख्याध्यापक डी. एम. साळुंखे, बूथ लेवल ऑफिसर जावेद बागवान, जनजागृती पथकाचे सदस्य मंगेश घाडगे, सर्व शिक्षक शिक्षिका आणि सुमारे पाचशे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी श्री. क्षीरसागर म्हणाले, “सर्व शिक्षक शिक्षिका यांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. तसेच शिक्षकांचे समाजातील स्थान आणि महत्त्व पाहता मतदानाचे महत्व जास्तीत जास्त घटकापर्यंत त्यांनी प्रभावीपणे पोहोचवावे. विद्यार्थी हे जरी आता मतदार नसतील तरीसुद्धा विद्यार्थ्यांना लोकशाही, राज्यघटना आणि मतदानाचे महत्त्व समजणे गरजेचे आहे आणि ते स्वतः मतदार नसले तरी त्यांनी आपले आई-वडील नातेवाईक कुटुंबातील इतर मतदार यांना मतदानाचे महत्त्व विद्यार्थी या नात्याने समजून सांगावे आणि त्यांना मतदानाची आठवण करावी. शंभर टक्के मतदान होणे ही आदर्श व्यवस्था आहे. लोकशाही सुदृढ आणि बळकट होण्यासाठी मतदान ही अत्यावश्यक बाब आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रात्रंदिवस कष्ट करून भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. तिचा सन्मान ठेवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे
अधिकाधिक लोकाभिमुख शासन येण्यासाठी जास्तीत जास्त मतदान होणे गरजेचे आहे .त्या दृष्टीने सर्व मतदारांनी “मी मतदान करणारच” असा निर्धार करावा आणि 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेचा लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करावे. महात्मा गांधी, शहीद भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस अशा अनेक महात्म्यांनी प्रचंड कष्टाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. या स्वातंत्र्याचे आपण प्राणपणाने रक्षण करायला हवे .त्यासाठी मतदान गरजेचे आहे.”मुख्याध्यापक डी एम साळुंखे यांनी आभार मानले.

