विनोद कुलकर्णी साहित्यिक नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व
सत्कार समारंभात नितीन देशपांडे यांचे प्रतिपादन
सातारा
विनोद कुलकर्णी यांच्या कार्यकर्तुत्वामुळे सातारा आणि सातारा जिल्यातील साहित्यिक,कवी,विचारवंत यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तसेच विविध साहित्यिक उपक्रमात आपला साहित्यिक ठसा उमटिवण्यासाठी मदत आणि प्रेरणा मिळते असे असे प्रतिपादन कुपर उद्योग समूहाचे मनुष्यबळ संसाधनाचे महाव्यवस्थापक आणि साहित्यप्रेमी श्री नितीन देशपांडे यांनी केले .विनोद कुलकर्णी यांचा गौरव करताना त्यांच्या साहित्यिक योगदानाचा उल्लेख करीत साताऱ्याचे हे साहित्यिक नेतृत्व पुणे तसेच महाराष्ट्रात आपल्या कार्यकर्तुत्वाने साताऱ्याचे नाव उज्वल करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष श्री विनोद कुलकर्णी यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक महामंडळाच्या सदस्यपदी नेमणूक झाल्याने दीप लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, आम्ही पुस्तक प्रेमी समूह आणि सातारकर नागरिकांतर्फे विनोद कुलकर्णी यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.
महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळावरची विनोद कुलकर्णी यांची नियुक्ती सातारा शहर तसेच जिल्यातील साहित्यिक उपक्रमांना उभारी देईल असा विश्वास नितीन देशपांडे यांनी व्यक्त केला. त्यांच्या बरोबरच्या अनेक उपक्रमांमधील आठवणींचा त्यांनी उजाळा दिला. विशेषत: मराठीतील क्रांतीकारक कवी बा.सी.मर्ढेकर यांच्या मर्ढे या गावी शासन उभे करीत असलेल्या स्मारकामध्ये वाचनालय सुरू करण्यासाठी कूपर उद्योग समूहाने केलेल्या मदतीचा उल्लेख त्यांनी केला.
वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी झटणारे विनोद कुलकर्णी यांनी भविष्यात वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी आणि साहित्य चळवळ अधिक बळकट करण्यासाठी मी अग्रक्रम देणार असे सांगितले.
श्री विनोद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात त्यांनी केलेल्या साहित्य सेवेचा आढावा घेतला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी त्यांच्या पुढाकाराने साताऱ्यातून एक लाख पत्रे माननीय पंतप्रधानांना पाठवण्यात आली. त्या चळवळीतला हा एक टप्पा. त्याचा निर्णय झाला. यासाठी अनोख्या नियोजनाने त्यांनी दिल्लीमध्ये जाऊनही आंदोलन केले. या सर्व गोष्टी सातारकरांसमोर उघड करताना ते भाऊक झाले होते.
या समारंभासाठी विशेष पुढाकार घेणारे दीप लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह श्री शिरीष चिटणीस यांनी आपल्या प्रास्ताविकात विनोद कुलकर्णी यांचे विशेष अभिनंदन करताना त्यांच्या कार्याचे महत्त्व आणि त्यांनी केलेली निर्णायक कृती ही उलगडून दाखवली.
पर्यावरण आणि साहित्यप्रेमी डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी कुलकर्णी हे सदस्य पदी नियुक्त झाल्याने सातारच्या साहित्य चळवळीला मोठे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आणि सातारकर विनोद कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाच्या सदस्यपदी नेमणूक होणे या दोन्ही घटना शुभ सूचक असल्याने त्याचा फायदा सातारा जिल्ह्यातील साहित्य चळवळीला होईल असे सांगितले.
आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे समन्वयक श्रीराम नानल यांनी आपल्या मनोगतात श्री विनोद कुलकर्णी यांनी जनता सहकारी बँकेला अडचणीतून बाहेर काढताना जे परिश्रम घेतले त्याचा विस्तार पूर्वक आढावा घेतला. श्री विनोद कुलकर्णी व सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र भोसले यांनी साताऱ्यामध्ये सहकार चळवळ बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आम्ही पुस्तक प्रेमी या समूहाने साताऱ्याची ही साहित्य चळवळ आरंभली आहे त्याचे नितीन देशपांडे यांनी कौतुक केले. विशेषतः शिरीष चिटणीस, डॉक्टर संदीप श्रोत्री, श्रीराम नानल आणि अन्य सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ श्याम बडवे यांनी केले.या कार्यक्रमासाठी संध्या चौगुले,डॉ सारिका देशपांडे,पद्माकर पाठकजी,डॉ.रविंद्र भोसले,डॉ कांत फडतरे, हेमंत कासार,अनंत जोशी,वजीर नदाफ,विनायक भोसले आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापक अनिल जठार तसेच जनता बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष उमेश साठे तसेच जनता बँकेचा स्टाफही या सोहळ्यास उपस्थीत होता.या सत्कार सोहळ्यास सातारकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

