बाबर-शाहीनची हकालपट्टी
इंग्लंड विरुद्धच्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर
इस्लामाबाद
पाकिस्ताननं इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर केला असून शान मसूदच्या नेतृत्वाखालील संघात नवीन खेळाडूंना स्थान मिळाले आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह यांना मोठा धक्का दिला.पीसीबीनं या खेळाडूंची संघातून हकालपट्टी केली आहे.
पीसीबीनं आपल्या अधिकृत वेबसाइटवर बाबर आणि शाहीनबाबत प्रतिक्रिया दिली आहे. बोर्डानं लिहिलं की, “निवडकर्त्यांनी बाबर आझम, नसीम शाह, सरफराज अहमद आणि शाहीन आफ्रिदी यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. अबरार अहमद अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे तो निवडीसाठी उपलब्ध नव्हता.”
बाबर, शाहीन, नसीम आणि सरफराज यांच्या जागी पीसीबीनं चार नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. हसीबुल्लाह, मेहरान मुमताज, कामरान गुलाम आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद अली हे ते 4 खेळाडू असल्याचं बोर्डानं सांगितलं. त्यांच्यासोबतच ऑफस्पिनर साजित खानलाही संघात स्थान मिळालं आहे. नोमान अली आणि जाहिद महमूद हे पहिल्या कसोटीसाठी मुख्य संघात होते. मात्र या दोघांना रिलिज करण्यात आलं आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ – शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसिबुल्लाह (यष्टीरक्षक), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नोमान अली, सैम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा आणि जाहिद महमूद

