लिपस्टिक लावली म्हणून महिलेची बदली
चेन्नईमधील प्रकरणाची जोरदार चर्चा चेन्नई
चेन्नई
लिपस्टिक लावल्याने आपली बदली करण्यात आल्याची तक्रार चेन्नई महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्याने केली आहे. विशेष म्हणजे ही तक्रारदार महिला शहराच्या पहिल्या दलित महिला महापौरांची पहिली महिला चोपदार आहे.शहराच्या पहिल्या दलित महापौर प्रिया राजन आणि त्यांच्या महिला चोपदार म्हणून पहिल्यांदाच नियुक्त झालेल्या माधवी यांच्यातील हा वाद आहे.15 वर्षे एकाच ठिकाणी काम करणाऱ्या माधवी यांची नुकतीच कामाच्या ठिकाणाहून दुसरीकडे बदली झाली. त्यामागेही लिपस्टिकचे कारण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
तीन वर्षांपूर्वी पहिल्या दलित महापौर म्हणून चेन्नई महापालिकेच्या महापौरपदी प्रिया राजन निवडून आल्या. महापालिकेत गेली 15 वर्षे काम करणाऱ्या माधवी यांची नूतन महापौरांच्या पहिल्या महिला चोपदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी महापौरांचे संरक्षण करणे, हे चोपदार म्हणून माधवी यांचे प्रमुख काम होते.
माधवी यांच्या म्हणण्यानुसार, या वादाची सुरुवात महापौर कार्यालयाने आयोजित केलेल्या महिला दिनाच्या एका कार्यक्रमातून झाली.त्या कार्यक्रमातून महापौर अचानक निघून गेल्या. परंतु नंतर लगेचच मला त्यांनी बोलावून घेऊन झापले. मी स्टेजवर कॅटवॉक का केला? असा जाब त्यांनी मला विचारला. त्यावेळी कार्यक्रमात इतर काय घडले, यावर काही चर्चा झाली नाही. मात्र तेव्हापासून मी लावलेल्या लिपस्टिकवर आक्षेप घेतला जाऊ लागला. जणू शस्त्र म्हणूनच ते माझ्याविरोधात वापरले जाऊ लागले.”
दुसरीकडे महापौरांनी माधवी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माधवी यांच्याशी लिपस्टिक लावण्याबद्दल ऑफिसमधील कोणीही बोलले नाही, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.त्याचबरोबर माधवी वेळेवर ऑफिसला येत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
चेन्नई महापालिकेत पूर्वीच्या पदावर नेमणूक व्हावी, म्हणून कायदेशीर लढाई लढण्याचा कोणताही विचार नसल्याचे माधवी यांनी स्पष्ट केले. जनतेतून आणि सोशल मीडियातून याबाबत मिळणारे समर्थनच संबंधितांवर दबाव आणेल, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, माधवी यांनी लिपस्टिक लावणे सुरुच ठेवले आहे. मात्र त्या स्थानिक आणि स्वस्त लिपस्टिक वापरतात.

