यशोदा इन्स्टिट्यूट्सकडून अजितदादांना श्रद्धांजली
अजितदादांच्या विचारांप्रती निष्ठा ठेवत कार्यरत राहणे हीच खरी श्रद्धांजली: प्रा. दशरथ सगरे
सातारा
यशोदा इन्स्टिट्यूट्स, सातारा येथे समाजकार्य, शिक्षण आणि मूल्याधिष्ठित विचारांचे प्रेरणास्थान असलेल्या अजितदादांच्या दुःखद निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी संस्थेच्या वतीने आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात अजितदादांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या जाण्याने समाजाने एक संवेदनशील, दूरदृष्टी असलेले आणि मार्गदर्शक नेतृत्व गमावले आहे, अजितदादांच्या विचारांप्रती निष्ठा ठेवत कार्यरत राहणे हीच खरी श्रद्धांजली: ठरेल अशी भावना प्रा. दशरथ सगरे यांनी व्यक्त केली.
या श्रद्धांजली कार्यक्रमास यशोदा इन्स्टिट्यूट्सचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, संजय मोरे, राजेंद्र यादव, संजय कदम, नितेश मोरे, विविध घटक संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
यावेळी बोलताना प्रा. दशरथ सगरे यांनी अजितदादांचे समाजातील बहुआयामी योगदान अधोरेखित केले. शिक्षण म्हणजे केवळ रोजगाराचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे, हा विचार त्यांनी सातत्याने मांडला. ग्रामीण भागातील युवक-युवतींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असून त्यांच्या कार्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे आयुष्य घडले, असे मान्यवरांनी सांगितले. त्यांची साधी जीवनशैली, स्पष्ट विचारसरणी आणि सर्वसामान्यांशी असलेली आपुलकी आजही अनेकांच्या स्मरणात असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले.
यावेळी प्रा. दशरथ सगरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,“अजितदादा हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते, तर ते विचारांची शाळा होते. शिक्षण, समाज आणि मूल्ये यांचा समतोल साधत त्यांनी आयुष्यभर कार्य केले. निर्णय घेताना त्यांनी नेहमीच माणुसकीला अग्रक्रम दिला. आज ते आपल्यात नसले, तरी त्यांच्या विचारांची ऊर्जा आम्हाला पुढील काळात मार्गदर्शन करत राहील. त्यांच्या विचारांवर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
कार्यक्रमाच्या शेवटी यशोदा इन्स्टिट्यूट्सच्या वतीने अजितदादांच्या स्मृती जपण्यासाठी शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प करण्यात आला. त्यांच्या विचारांप्रती निष्ठा ठेवत कार्यरत राहणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
श्रद्धांजली कार्यक्रम शांत, गंभीर आणि भावनिक वातावरणात पार पडला. अजितदादांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असली, तरी त्यांचे कार्य व विचार पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील, असा विश्वास व्यक्त केला.

