गणेशावरील काव्यांना मिळाले चित्ररूप


साताऱ्यातील खण आळीत साकारला ‘काव्य-चित्र’ गणेश

प्रतिनिधी, सातारा
साताऱ्यातील खण आळी येथील पाठकजी कुटुंबीयांनी यंदा ‘काव्य-चित्र’ ही संकल्पना घेऊन घरगुती गणपतीसमोर सजावट साकारली आहे. ‘ज्ञानगणेश’, ‘संगीतगणेश’, ‘क्रीडागणेश’, ‘वारलीगणेश’, ‘अर्थगणेश’, ‘विद्यागणेश’ आदी संकल्पनांवर आधारित गणेश सजावटीनंतर यंदा वेगळ्या स्वरूपाची संकल्पना असलेला ‘काव्य-चित्र’ गणेश साकारण्यात आला आहे.
विविध कलांचा अधिपती असलेल्या गणेशाचे वर्णन विविध स्वरूपाच्या काव्यामध्ये आतापर्यंत झाले आहे. अगदी पारंपरिक स्तोत्रांपासून ते चित्रपटगीतांपर्यंत चराचरामध्ये गणराय आपल्याला दिसतो. यापैकी काही कविता, गाणी या महाराष्ट्राच्या विविध भागांतील चित्रकरांना देण्यात आल्या आणि त्या गीतावर किंवा स्तोत्रावर आधारित चित्र काढण्यास सांगण्यात आले. विविध काव्यांवरील अशी २१ चित्रे चित्रकारांकडून काढून घेण्यात आली असून, ते काव्य आणि सोबत त्यावर रेखाटलेले गणपती या सजावटीमध्ये मांडण्यात आले आहे.

Advertisement

कोणत्या काव्याचा समावेश?
संत तुकाराम, संत एकनाथ यांच्या रचनांपासून ते अगदी गणेशावरील बालकवितांपर्यंत विविध रचनांवरील गणेश या सजावटीमध्ये साकारण्यात आले आहेत. अगदी खडूने रंगविलेल्या चित्रापासून ते सध्या सर्वत्र बोलबाला असलेल्या ‘एआय’ चित्रापर्यंत चित्रे काढून घेतली आहेत. त्यामध्ये कॅनव्हासवरील चित्रे, हाताने काढलेली चित्रे, डिजिटल स्वरूपातील चित्रे असे सर्व प्रकारचे वैविध्यही आहेच. ॲक्रेलिक कलर्स, तेली खडू, पोस्टर कलर्सचा वापर त्यासाठी करण्यात आला आहे. ग. दि. माडगूळकर, मधुसुदन कालेलकर, बाळ कोल्हटकर, शांता शेळके, विलास जैतापकर, हरेन जाधव यांच्या काव्यांसह पारंपरिक आरती, भूपाळी, स्तोत्र असे विविध काव्यप्रकार इथे साकारले आहेत.

महाराष्ट्रातील चित्रकारांचा समावेश
महाराष्ट्राच्या विविध भागांतील विजयराज बोधनकर, रोहन पोरे, शेखर हसबनीस, गौरांग पुणतांबेकर, वृषाली मालणकर, रणजित देवकुळे, सौरभ उपळेकर, डॉ. संदीप श्रोत्री, श्वेता हसबनीस, ओंकार शिवदे, चैतन्य फोफळे, स्नेहा संसारे, जिया बोरगावकर, शौनक कुलकर्णी अशा विविध वयोगटातील व्यावसायिक आणि हौशी अशा दोही प्रकारच्या चित्रकारांनी आपापल्या प्रतिभेप्रमाणे या ‘काव्य चित्र गणेशा’ला न्याय दिला आहे. ‘आतापर्यंत विविध कवितांची गणपतीची गाणी आपण ऐकली आहेत. मात्र, याच कवितांना चित्र रूप दिले तर त्या कशा दिसतील असा विचार केला. चित्रकारांनीही आमच्या या कल्पनेला मनापासून दाद दिली,’ अशी माहिती या सजावटीची संकल्पना मांडणारे ज्येष्ठ लेखक आणि चित्रपट समीक्षक पद्माकर पाठकजी यांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!