माझा अभिमन्यू होणार नाही
देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला
मुंबई
माझ्याविरुद्ध कितीही चक्रव्यूह रचले तरीही मी अभिमन्यू होणार नाही. मी आधुनिक अभिमन्यू असल्याने चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे मला माहिती आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी काही माध्यमात बातमी पाहिली, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी फक्त देवेंद्र फडणवीसांवर हल्ला करा असे सांगितले ही आनंदाची गोष्ट आहे. यातून तुमचं राजकारणातील स्थान किती बळकट आहे याचा अंदाज येतो. सगळ्यांना मिळून एकाच व्यक्तीवर हल्ला करावा वाटतं, उद्धवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस तेच करते. हे माझ्याविरुद्ध चक्रव्यूह तयार करतायेत. तुम्ही चक्रव्यूह तयार करून मला अभिमन्यू करायचा प्रयत्न करत असला तरी मी आधुनिक अभिमन्यू आहे त्यामुळे चक्रव्यूहात शिरायचं कसं आणि त्यातून बाहेरही यायचं मला माहिती आहे.
सर्व्हे लीक होत नाहीत, टेबलावर बसून केलेला सर्व्हे तो त्यांनी लीक केला. उद्धव ठाकरे आणि आमचे पटत नसले तरी सांगतो, हा जो काही सर्व्हे तो उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवण्याकरता तयार केलेला आणि लीक केलेला सर्व्हे आहे. दुसरा या सर्व्हेत काही अर्थ नाही. त्यांना हे दाखवून द्यायचे होते की, कुठे तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याचं बोलताय, तुम्ही चौथ्या-पाचव्या नंबरवर चालले आहात. उद्धव ठाकरेंना काँग्रेसनं सर्व्हेतून जागा दाखवली.
आता तर शरद पवारांनी स्पष्टपणे घोषित केले मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार नाही आणि त्यावर नाना पटोलेंनी लगेच री ओढली मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात जे आहे ते नाकारलं आहे. शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे हे शिजतंय. त्यांच्या डोक्यात जे काही ३-४ चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही असा दावाही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

