महायुतीचे १७३ जागांवर एकमत
उर्वरित ११५ जागांवर नंतर निर्णय होणार
मुंबई
विधानसभा निवडणुका ऐन तोंडावर आल्या असतानाच, आता विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. जागावाटपाच्या बैठकीत तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचे दिसून येत आहे.जागावाटपाच्या दुसऱ्या फेरीत राज्यातील २८८ पैकी १७३ जागांवर शिंदे-फडणवीस-अजितदादांचे एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची जागावाटपाबाबतची दुसरी फेरी नागपुरात पार पडली. जवळपास ३ तास रंगलेल्या या बैठकीत तिन्ही पक्षांनी १७३ जागा कुणी लढवायच्या, याचा निर्णय घेतला आहे. याच बैठकीत मोठा भाऊ भाजपला सर्वाधिक जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपनंतर शिंदेंच्या शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळतील, यावरही तिन्ही पक्षांचा सूर जुळला. मात्र कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावर अजून निर्णय झालेला नाही. उर्वरित ११५ जागांचा तिढा अद्याप सुटला नसला, तरी त्यावर नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. महायुतीतील घटक पक्षांनाही जागा सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. विशेष म्हणजे, लोकसभेला शेवटच्या क्षणी जागावाटप झाले, त्याचा फटका महायुतीला राज्यात बसला. यावेळी मात्र सुरुवातीलाच जागावाटपाचा निर्णय घ्यायचा, असा निर्णय तिन्ही पक्षांनी घेतला आहे.
गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप मोठा भाऊ असणार आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला सर्वाधिक जागा येण्याची शक्यता आहे. भाजप १४० ते १५० जागा लढवू शकते. शिंदेंच्या शिवसेनेला ७० जागांवर, तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ६० जागांवर उमेदवार उतरवण्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, अंतिम जागावाटप १० दिवसांमध्ये जाहीर करू, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
शनिवारी रात्री झालेल्या या बैठकीत विजयी होऊ शकणाऱ्या उमेदवारालाच प्राधान्य देण्याबाबत एकमत झाल्याची चर्चा आहे. जो पक्ष जी जागा जिंकू शकेल, त्यालाच आम्ही महत्त्व देत आहोत. उमेदवारांची क्षमता पाहून कोणत्या पक्षाला तिकीट जाईल, हे निश्चित होणार आहे. सक्षम उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात येईल. केवळ विजय हेच उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जागांचा आग्रह कोणत्याही पक्षाने धरलेला नाही. वेळ पडली तर एक पाऊल मागे घेण्याचीदेखील तयारी असेल. १० सप्टेंबरनंतर महायुतीचे नेतेच जागावाटप जाहीर करतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

