प्रकाशरेषा पुस्तकात विधायक विचारांचा धागा
श्रीकांत कात्रे यांच्या ‘प्रकाशरेषा’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : सकाळचे संस्थापक संपादक नानासाहेब परुळेकर यांच्या विधायक विचारांचा वारसा वेगवेगळ्या स्वरूपात पुढे नेला जात आहे. याच विचारांच्या धाग्यातून प्रकाशरेषा पुस्तकातील व्यक्तींचे चित्र श्रीकांत कात्रे यांनी रेखाटले आहे, असे मत महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक सारंग दर्शने यांनी व्यक्त केले.
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व लोकमंगल ग्रूप शिक्षण संस्था यांच्या विद्यमाने पुणे येथील पत्रकार भवनात शुक्रवारी दि. ३० ऑगस्ट रोजी श्री. श्रीकांत कात्रे यांनी लिहिलेल्या ‘प्रकाशरेषा’या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्री. सारंग दर्शने बोलत होते. यावेळी दै. प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, उत्कर्ष प्रकाशनचे सु. वा. जोशी, केसरीचे वृत्त संपादक स्वप्नील पोरे,महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, सौ. शिल्पा चिटणीस आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळच्या संस्कारातून घडलेले अनेक जण आज विविध पदांवर विधायक विचारांतून कार्यरत आहेत याचा उल्लेख करुन श्री. सारंग दर्शने यांनी प्रकाशरेषा पुस्तकातील व्यक्तींचे जीवनकार्य मार्गदर्शक असल्याचे स्पष्ट केले. सातारा जिल्ह्यात विविध क्षेत्रांत अनेक थोर व्यक्तीं होऊन गेल्या आणि काही जण आजही त्याच तडफेने कार्यरत आहेत, हे प्रकाशरेषा या पुस्तकांतून समजते, असे गौरवोद्गार ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर यांनी काढले.
अशा व्यक्ती सामाजिक जीवनाची उंची वाढवितात हे या पुस्तकातील व्यक्तींविषयीचे वाक्य मनाला भावते, असे सांगून श्री. मालकर यांनी या पुस्तकामधील लेख २४ वर्षांपूर्वीचे आहेत. त्यानंतरच्या काळात झालेल्या बदलांचा वेध घेऊन श्री. कात्रे यांनी पुस्तकाचा दुसरा भाग लिहावा, असे श्री. मालकर यांनी सुचविले.
समाज जीवनाला आकार देणाऱ्या व्यक्तींविषयीचे हे एकत्रित लेखन असल्याचा उल्लेख करुन सारंग दर्शने यांनी प्रकाशरेषा पुस्तकातील व्यक्तींचे जीवनकार्य मार्गदर्शक असल्याचे स्पष्ट केले.
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची पुस्तके वाचली. व्याख्याने ऐकली.परंतु, त्यांनी केलेला संघर्ष प्रकाशरेषा पुस्तकातून समजला असे श्री. बी. एल. स्वामी यांनी सांगितले. समाजाला प्रेरणा देणारे अशा व्यक्तींचे कार्य समाजासमोर आले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
श्री. कात्रे यांनी आणखी लेखन करावे, अशी अपेक्षा श्री. सु. वा. जोशी यांनी व्यक्त केली. प्रकाश रेषा पुस्तकातील व्यक्तींचे कार्य पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे, असे मनोगत श्री कात्रे यांनी व्यक्त केले.
सातारा येथे झालेल्या साहित्य संमेलनाबाबतचा उल्लेख करुन श्री. शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविकात प्रकाशरेषा पुस्तकाच्या प्रवासाविषयी तसेच श्री. कात्रे यांच्या ऋणानुबंधाविषयी प्रसंग सांगितले. श्री कात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. मालकर, श्री. स्वामी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वप्नील पोरे यांनी सूत्रसंचालन केले.
