पाटण ते कोयनानगर रस्त्याचे काम १५ दिवसात सुरु करा


पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

Advertisement

सातारा,
पाटण ते कोयनानगर या १३ कि.मी रस्त्याचे काम प्रलंबित आहे. या रस्त्यांवर अनेक खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्याबरोबर रस्त्यांचे काम 15 दिवसात सुरु करा, असे निर्देश ‍पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात पाटण ते कोयनानगर रस्त्यांच्या कामासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समिर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता दयानंद विभुते, कार्यकारी अभियंता श्रुती नाईक आदी उपस्थित होते.
पाटण ते कोयनानगर रस्त्यांवरील पडलेले खड्डे तात्काळ बुजवावेत, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, हे खड्डे बुजविण्यासाठी जास्तीचा मनुष्यबळाचा वापर करावा. बुजविलेले खड्डे पावसामुळे पुन्हा उखडणार नाहीत, याची दक्षता घ्या.
पाटण ते कोयनानगर 13 कि.मी कामासाठी 82 कोटी 82 लाख निधी मंजूर असून हे काम ऑल ग्रेस डेव्हलपर प्रा.लि. कंपनी करणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या कंपनीने रस्त्याच्या कामासाठी लागणारी यंत्रसामुग्री लवकरात लवकर आणावी. हे काम 15 दिवसात सुरु करावे. काम करीत असताना त्याचा दर्जाही चांगला ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत केल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!