पूजा खेडकर यांचे प्रशिक्षणार्थी पद रद्द


भविष्यात सर्व परीक्षा देण्यावरही बंदी

Advertisement

नवी दिल्ली
केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने पूजा खेडकरविरुद्ध कारवाई केली असून तिचे प्रशिक्षणार्थी आयएएस पद रद्द करण्यात आले आहे.त्याचबरोबर भविष्यातील सर्व परीक्षांना बसण्यास पूजा यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.यूपीएससीने केलेल्या चौकशीत पूजा खेडकरने नागरी सेवा परीक्षा-2022च्या नियमांचा भंग केल्याचं समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
यूपीएससीने 19 जुलै 2024 रोजी एक पत्रक प्रसिद्ध करून पूजा खेडकर यांनी स्वतःच्या नावात, त्यांच्या वडिलांच्या नावात तसेच आईच्या नावात बदल करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचं समोर आल्याचं म्हटलं होतं.पूजा खेडकर यांनी परीक्षेचा फॉर्म भरत असताना फोटो, सही, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून परीक्षा देण्याची कमाल मर्यादा ओलांडली असल्याचंही यूपीएससीने स्पष्ट केलं होतं.
यूपीएससीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, पूजा खेडकर नागरी सेवा परीक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्या आहेत.केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना 18 जुलै 2024 रोजी नागरी सेवा परीक्षा-2022च्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पूजा खेडकर यांनी आपली खोटी माहिती देत परीक्षा देण्याची कमाल मर्यादा ओलांडली असल्याचं यूपीएससीने म्हटलं होतं.
34 वर्षीय पूजा खेडकर यांना 25 जुलै 2024 पर्यंत बाजू मांडण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, तिने 4 ऑगस्टपर्यंत वेळ वाढवून मागितला. यूपीएससीने तिला 30 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आणि ही शेवटची संधी असून त्यापेक्षा जास्त वेळ दिला जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं.मात्र, या वाढवून दिलेल्या मुदतीतही पूजा खेडकरने आपली बाजू न मांडल्यामुळे यूपीएससीने ही कारवाई केली आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!