विराट पर्व
विशेष लेख/शरद महाजनी
प्रचंड गर्दीने भरलेले स्टेडियम.त्या स्टेडियममध्ये घुमणारा विराट..विराट..असा आवाज..
त्या आवाजाला छेद देणारी ती नीरव शांतता..
स्टेडियमवर गर्दी करणाऱ्या हजारो क्रिकेटप्रेमींच्या खिळलेल्या त्या भावपूर्ण नजरा,त्या नजरेतील तो अभिमान, नकळत डोळ्यातून वाहणारे अश्रू..
क्रिकेटप्रेमींची मानवंदना स्वीकारत बॅट उंचावत त्यांना केलेले अभिवादन..
शांत पावलांनी सुरू असलेला तो प्रवास..
ते भारावलेले क्षण आणि फक्त टाळ्यांचा प्रचंड कडकडाट..
श्वास रोखून धरलेले ते क्षण..
विजयाच्या थाटात दिला जाणारा तो आदरयुक्त ,भावपूर्ण निरोप….
विराट,तुझी निवृत्ती अशी पहायची होती रे तुझ्या करोडो चाहत्यांना..ज्यांनी तुझ्यावरून जीव ओवाळून टाकला..पण तू तुझ्या स्वभावाला न शोभेल अशी शांतपणे निवृत्तीची घोषणा करत बॅट म्यान केलीस.. अनपेक्षितपणे..तुझे ते चैतन्यदायी रूप पाहायची सवय झालेल्या डोळ्यांना ही नीरव शांतता मानवली नाही रे..तुझी मैदानावरची प्रत्येक गोष्ट,तुझा सळसळता उत्साह, ऊर्जा पाहायची सवय झाली होती रे साऱ्यांना.अशावेळी तुझे हे शांत रूप पाहून कितीजण निःशब्द झाले रे.
आज दुपारी मी मोबाईलवर सचिन तेंडुलकर याचे कसोटी सामन्यातील ५१ वे शतक पाहात बसलो होतो आणि एवढ्यात एक बातमी आली, विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त.. त्या क्षणी दोन अश्रू झरले डोळ्यातून नकळत..एक सचिनसाठी,एक तुझ्यासाठी..सचिनचा शतकांचा विक्रम मोडण्याची ताकद फक्त तुझ्या बॅटमध्ये होती रे..हो,अलीकडे तुझ्या कसोटीत फारशा धावा होत नव्हत्या हे मान्य करून सुद्धा मला खात्री वाटत होती,हा धावांचा दुष्काळ संपेल आणि तुझ्या बॅटमधून पुन्हा धावा बरसू लागतील. जगातील दिग्गज खेळाडू,समीक्षक यांना पण तसेच वाटत होते.त्यातून तुझा अफलातून फिटनेस, सर्वस्व झोकून देऊन मैदानावर खेळण्याची वृत्ती,तुझा उत्साह, ऊर्जा,जिद्द..सारे काही होते रे तुझ्याकडे..पण तू अनपेक्षित निवृत्तीचा निर्णय घेतलास आणि सर्वत्र सन्नाटा पसरला.
अर्थात असा निर्णय घेताना तुझ्या मनाची काय अवस्था झाली असेल त्याची कल्पना आहे.क्रिकेटमधील सम्राटपद सोडून शस्त्रे खाली ठेवताना तुझ्या मनाची काय घालमेल झाली असेल ते जाणतो आम्ही.पण तरीही असे वाटते,काहीशी घाई केलीस तू.तरीही तुझ्या निर्णयाचा आम्ही मान राखू.कारण तू करोडो भारतीयांना,करोडो क्रिकेटप्रेमींना जो आनंद दिला आहेस, त्यासाठी तुझे कृतज्ञ राहू.तुला कधीही विसरणार नाही.जेव्हा जेव्हा भारतीय संघ कसोटी सामन्यात मैदानावर उतरेल, तेव्हा तुझी आठवण नक्की येईल.कारण ती आठवण सर्वांना प्रेरणा,ऊर्जा,विजयाचा,लढण्याचा मंत्र देत राहील.
अलविदा.. विराट.
शरद महाजनी