स्टेट बँकेचे कर्ज झाले महाग


कर्जदारांना आता जास्त ईएमआय भरावा लागणार
नवी दिल्ली
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ही आपल्या देशातील सर्वात मोठी बँक आहे. कोट्यवधी ग्राहक या बँकेची सेवा घेतात. मात्र, आता या बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा आर्थिक धक्का दिला आहे.बँकेने ठराविक मुदतीसाठी आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड-बेस्ड कर्जाच्या (एमसीएलआर) दरात 10 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे ऑटो लोन आणि पर्सनल लोनसह इतर लोनही महाग होणार आहेत. कर्जदारांना आता जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. नवीन दर 15 जुलै 2024 म्हणजेच आजपासून लागू झाले आहेत.
एसबीआयने सहा महिने, एक वर्ष आणि दोन वर्षांच्या कालावधीतील कर्जांसाठी एमसीएलआर दर 0.10 टक्क्यांनी वाढवले आहेत. त्यामुळे हे दर आता अनुक्रमे 8.75 टक्के, 8.85 टक्के आणि 8.95 टक्के झाले आहेत. तीन वर्षांचा एमसीएलआर पाच बेस पॉइंट्सने वाढवून नऊ टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी जूनमध्ये, बँकेने निवडक कालावधीसाठी एमसीएलआर 10 बीपीएसने वाढवला होता.
मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट म्हणजे एमसीएलआर. हा किमान कर्जदर आहे आणि त्यापेक्षा कमी दराने बँका कोणालाही कर्ज देऊ शकत नाहीत. पर्सनल आणि कार लोनच्या ईएमआयवर एमसीएलआरचा थेट परिणाम होतो. एमसीएलआर वाढल्यामुळे नवीन कर्ज महाग होतात. याशिवाय, कर्जदारांच्या सध्याच्या ईएमआयमध्ये देखील वाढ होते.
एसबीआयने एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेटमध्ये (ईबीएलआर) कोणताही बदल केलेला नाही. तो 9.15 टक्क्यांवर ठेवण्यात आला आहे. सर्व होम लोन एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेटशी जोडलेले असतात. एसबीआय होम लोनचे व्याजदर 8.50 टक्के ते 9.65 टक्क्यांदरम्यान आहेत. कर्जदाराच्या सिबिल स्कोअरनुसार व्याजदर बदलतो. जर स्कोअर चांगला असेल तर कमी व्याजदराने कर्ज मिळते आणि सिबिल स्कोअर कमी असेल तर व्याजदर वाढतात.
रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. फेब्रुवारी 2023 पासून रेपो रेट 6.5 टक्के आहे. मध्यवर्ती बँकेने आठव्यांदा रेपो रेट स्थिर ठेवला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या (एमपीसी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!