मनोज जरांगेंचे २० जुलैपासून पुन्हा उपोषण
अंतरवाली सराटीमधून केली घोषणा
जालना
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला 13 जुलैपर्यंतचा वेळ दिला होता. मात्र डेडलाईन संपूणही आरक्षण न मिळाल्यां जरांगे पाटील यांनी आता मोठी घोषणा केली आहे. आजपासून आमची रणनिती सुरू झाली असून, पुन्हा एकदा 20 तारखेपासून अमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
आजपासून आमची पुढची रणनिती सुरु झाली असून येत्या 20 तारखेला पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते अंतरवाली सराटीत पत्रकारांशी बोलत होते. तेरा तारखेचा सरकारला दिलेला वेळ संपला, मात्र सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाहीये. येत्या 20 तारखेला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची बैठक कधी घ्यायची हे देखील ठरवलं जाईल असं जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, लक्ष्मण हाके हे आमचे विरोधक नाहीत, त्यामुळं त्यांच्यावर मी बोलणार नाही. मात्र धनगरांना एसटी प्रवर्गातून कसं आरक्षण मिळेल हे त्यांनी पाहिले पाहिजे. छगन भुजबळांनी धनगर बांधवांचा वापर करून राजकीय फायदा घेवू नये. मराठा आणि धनगरांचं वैर हे छगन भुजबळांनीच लावून दिलं असल्याचा आरोपही यावेळी जरांगे पाटील यांनी केला आहे.
