सनी भाई… तुस्सी ग्रेट हो
विशेष लेख/शरद महाजनी
शरद,हा बघ भारताचा भावी सलामीवीर…
माझे क्रिकेट वेडे भास्कर मामा मला सांगत होते.
साल होते १९६९. ठिकाण..मुंबईचे ब्रेबर्न स्टेडियम.मुंबई आणि राजस्थान या संघातील रणजी ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना.अजित वाडेकर यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि अशोक मंकड बरोबर छोट्या चणीचा एक फलंदाज मैदानावर आला.समोर गोलंदाज होते राज सिंग डुंगरपूर,कैलास गटाणी.पण या दोघांना समर्थपणे तोंड देत सलामीवीर खेळत होते.तेव्हाच मला मामा म्हणाले,हा बघ भारताचा भावी सलामीवीर सुनील मनोहर गावसकर.त्याचा तो पहिलाच रणजी सामना.तो आणि मनकड यांनी २५० धावांची भागीदारी केली.अर्थातच दोघांनी शतके झळकावली.सुनील गावसकर यांची ती तंत्र शुध्द,शैलीदार फलंदाजी मला अजून आठवते.

सातारला आलो नि हा किस्सा मी क्रिकेट कट्ट्यावर सांगितला तेव्हा आमचा मित्र जगू मुळे याने सुनील गावसकर याच्याबद्दल एवढी सुंदर माहिती दिली की क्या बात है.अगदी स्कूल,कॉलेज,विद्यापीठ क्रिकेट पासून.हा जगू क्रिकेटमधील किडा आहे.त्याच्या स्टाईलमध्ये त्याला ऐकणे हा आनंद वेगळाच .
मग मी पण सुनील गावसकर यांचा फॅन झालो,आजही आहे.त्यांना प्रत्यक्ष खेळताना पाहण्याचा योग आला पुण्यात,नेहरू स्टेडियमवर.दुलीप ट्रॉफी सामन्यात.प्रसन्न,वेंकट,चंद्र शेखर या फिरकी जादूगार मंडळी समोर खेळताना.काय ते तंत्र,फूट वर्क,शैलीदार फलंदाजी.असा योग पुन्हा आला तो भारत पाकिस्तान एक दिवसीय सामन्यात.तो सामना मी प्रेस बॉक्स मध्ये बसून पाहिला.पण रमण लांबा याच्या चुकीमुळे सुनील लवकर धावबाद झाला.भारताचा डाव अवघ्या१२५ धावांवर आटोपला.समोर होते इम्रान खान,जावेद ,सलीम मलिक, मुद्स्सर नझर अशी मंडळी.
त्या दरम्यान सातारला झालेल्या टाटा विरुद्ध निरलोन या महोत्सवी सामन्यात शाहू स्टेडियमवर गावसकर,चेतन चौहान ही भारताची सलामी जोडी खेळली .याच सामन्यात अनेक कसोटीपटू होते.एरवी गावसकर यांची फलंदाजी पाहिली ती दूर दर्शनवर.किती तरी लाजवाब इनिंग आज मला आठवतात.कसोटी,वन डे.१९८३ मधील वर्ल्ड कप.१९८५ मधील ऑस्ट्रेलिया येथील ती स्पर्धा आणि किती तरी.हा सारा इतिहास लिहायचा म्हंटले तर आठवडा लागेल.
आज गावसकर यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली.त्या निमित्त मला आठवते ती त्यांच्या,माझ्या भेटीची हॅटट्रिक.हो,मी कधी स्वप्नात सुद्धा ही कल्पना केली नव्हती की जगातला हा सर्व कालीन महान फलंदाज मला भेटेल,ते सुध्दा चक्क तीन वेळा.त्यातली पहिली भेट १९७८ मध्ये नागपुरात. त्यावेळी ते बँक ऑफ महाराष्ट्रनी आयोजित केलेल्या रिक्रीएशन क्लबच्या कार्यक्रमात.तेव्हा त्यांच्या बरोबर सौ.मार्शनील होत्या.त्यांच्या मांडीवर छोटा रोहन.माझे मित्र प्रकाश सरवटे यांच्यामुळे झालेली ती पहिली भेट.त्यावर आधारित मी केलेली स्टोरी.
दुसरी भेट साताऱ्यात. रॅम्सन कलर लॅबच्या उद्घाटन कार्यक्रमात.त्याचवेळी सातारा नगर परिषदेने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात.त्यावेळी श्री. छ.शिवाजीराजे भोसले अध्यक्ष होते.मी पहिल्या रांगेत पत्रकार म्हणून बसलो होतो.कार्यक्रम सुरू असताना माझे सर्व लक्ष गावसकर यांच्याकडे होते.हे त्यांनी पण जाणले असावे.म्हणून मी त्यांना नागपूर भेटीची आठवण करून देणारी एक चिठ्ठी स्टेजवर पाठवली.ती वाचून ते हसले आणि मला नंतर भेटा असे त्यांनी खुणावले.त्या गर्दीत एवढ्या महान फलंदाजाने बारा वर्षापूर्वी भेटलेल्या माझ्या सारख्या सामान्य माणसाची आठवण ठेवत भेटायला बोलावले,हा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही.त्या भेटीत गर्दीमुळे फार बोलता नाही आले.पण तो क्षण मला खूप आनंद देऊन गेला.
साताऱ्यात त्यांची पुन्हा भेट झाली ती शाहू स्टेडियमवर.एम.सी. ए.चे सचिव बापूसाहेब जोशी यांच्या गौरवार्थ आयोजित टाटा वि. निरलॉन या सामन्यावेळी.त्यावेळी मी सातारा जिल्हा क्रिकेट असो.मध्ये होतो.खेळाडूंच्या रूम जवळ मी व्हॉलीटीयर म्हणून काम करत होतो.तेव्हा पण त्यांनी मला ओळखले.गौरव सामना असून सुद्धा त्यांनी केलेली ती फलंदाजी मला आठवते.बाद झाल्यावर रूम मध्ये पुस्तक वाचनात दंग असलेले गावसकर मी तेव्हा पाहिले .त्याच सामन्यात लंच टाईम मध्ये खेळाडू,मान्यवरांच्या गराड्यात त्यांना मी पाहिले.
एका महान फलंदाजाच्या भेटीची ही आठवण आजही मला त्या क्रिकेटच्या विश्वात घेऊन जाते आणि मग मीच माझ्या भाग्याचा हेवा करत बसतो.आज जगभरातील लाखो,करोडो क्रिकेट प्रेमी,दिग्गज खेळाडू,समीक्षक,पत्रकार या विश्व विख्यात फलंदाजाला शुभेच्छा देत त्यांना सन्मानित करत आहेत.या अमृत महोत्सवी सोहळ्यात अप्रत्यक्ष सहभागी होत त्या आठवणींना उजाळा देताना मी धन्य झालो आहे.पण त्याचवेळी एक सल मनात आहे,त्यांच्या,माझ्या भेटीच्या हॅटट्रिक ची एकही आठवण फोटो रुपात माझ्याकडे नाही.
शरद महाजनी
