पोर्शे अपघातातील आरोपीने निबंधात काय लिहिले ?
अपघात झाल्यानंतर पळून न जाण्याचा सल्ला
पुणे
पुण्यात 19 मे रोजी एक भीषण अपघात घडला होता. भरधाव पोर्शे कारनं दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडलं. कल्याणीनगर परिसरात झालेल्या या अपघातामध्ये अपघातग्रस्त अभियंता तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला.मुलगा अल्पवयीनं असल्यानं हे प्रकरण बाल न्याय मंडळाकडे पोहोचलं, बाल न्याय मंडळानं या आरोपीला अपघातावर निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावत त्याला जामीन दिला होता.
दरम्यान या मुलाला बाल न्याय मंडळानं निंबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती. या मुलानं आपला निबंध बाल न्याय मंडळाकडे सादर केला आहे. या निबंधामध्ये ‘ सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजे आहे, वाहतूक नियमांचे पालन करणे का आणि कसे गरजेचे आहे. सामाजिक सुरक्षेसाठी किती महत्त्वाचे आहे’ याबाबत या अल्पवयीन आरोपीनं माहिती लिहीली आहे.
‘माझ्याकडून अपघात घडला, अपघात झाल्यानंतर मला पोलिसांची भीती वाटत होती. त्यामुळे मी पळून जाण्याच्या मानसीकतेत होतो. लोकांनी मला मारहाण देखील केली, मात्र अपघात झाल्यानंतर पळून जाऊ नका. पोलिसांना शरण या. अपघाताची माहिती द्या. त्यानंतर बाकीच्या गोष्टी पोलीस करतील. अपघातग्रस्तांना शक्य तितकी मदत करा. अपघात झाल्यानंतर तुम्ही पळून गेलात तर अडचणीत याल’ असं या अल्पवयीनं आरोपीनं आपल्या निबंधात म्हटलं आहे.
