टीम इंडिया विश्वविजेता


थरारक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात
बार्बाडोस
भारताने अखेर टी20 क्रिकेट विश्वचषक स्वतःच्या नावे केला आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत रोहित शर्माच्या टीम इंडियाने दुसरा टी20 विश्वचषक भारताला मिळवून दिलाय.शेवटच्या बॉलनंतर रोहित शर्मापासून प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या डोळ्यात आश्रू होते.आयपीएलमध्ये ट्रोल झालेल्या हार्दिक पंड्यासाठी हा विजय त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विजय होता आणि जागतिक गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या जसप्रीत बुमराहसाठी हा विश्वविजय तेवढाच महत्त्वाचा होता.
भारताने दिलेले १७७ धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेला पेलवले नाही आणि भारताने एका अविश्वसनीय विजयाची नोंद केली

Advertisement

विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही गेल्या तीन-चार वर्षांमध्ये खूप परिश्रम घेतले. त्याचे फळ आजच्या यशानं मिळाले. आम्ही आधीही दबावात खेळलो होतो, तेव्हा काही चुकाही झाल्या.पण आज दबावात नेमकं काय करयाला हवं, याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. अशा स्पर्धा जिंकण्यासाठी क्रिकेटपटूंबरोबरच व्यवस्थापनाचा मोठा पाठिंबा लागतो, तो आम्हाला कायम मिळाला.”
विराटच्या फॉर्मबाबत बोलताना रोहित म्हणाला की, “विराटच्या फॉर्मची कोणालाच चिंता नव्हती. सगळ्यांना त्याचा दर्जा माहिती आहे. तो आज दिसला. त्यानं एक बाजू सांभाळली ती आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची होती. विराटनं त्याच्या अनुभवाच्या जोरावर दबावात खास कामगिरी केली.अक्षरच्या फलंदाजीनं संघाला फायदा झाला. बुमराहला मी अनेक वर्षांपासून पाहत आहे. तो नेमकं काय आणि कसं करू शकतो हे चांगलंच माहिती आहे. तो अत्यंत दुर्मिळ गोलंदाज आहे. हार्दिकनंही ज्याप्रकारे कामगिरी केली त्याचा मोठा अभिमान आहे.”
पंधराव्या ओव्हर मध्ये अक्षर पटेलने 24 धावा दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 30 बॉलमध्ये 30 धावा हव्या होत्या. ओव्हर संपल्यानंतर अक्षर पटेलने वर्ल्डकप फायनलमध्ये भारतीय गोलंदाजाची सगळ्यात महागडी ओव्हर स्वतःच्या नावे केली. हताश झालेल्या कर्णधार रोहित शर्माने जगातला अव्वल गोलंदाज असणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या हातात बॉल दिला आणि दक्षिण आफ्रिकेकडे झुकलेला वर्ल्डकप भारताकडे परत येताना दिसू लागला सोळाव्या ओव्हरमध्ये बुमराहने फक्त चार धावा खर्च केल्या आणि मोक्याच्या क्षणी कच खाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज गडबडबले.5 षटकार खेचल्या हेनरीक क्लासेनला हार्दिक पंड्याने उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू छेडायचा मोह झाला आणि सतराव्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर क्लासेन आउट झाला.सतराव्या ओव्हरमध्ये पंड्याने फक्त चार धावा केल्या आणि मैदानात उभ्या असलेल्या डेव्हिड मिलर आणि मार्को यान्सन यांच्यावरचा दबाव वाढला. आता प्रश्न होता बुमराह शेवटची ओव्हर कधी टाकतो?जसप्रीतने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आणि साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीच्या जोरावर सामना जिंकवून दिलेल्या मार्को यान्सनचा त्रिफळा उडाला.अठराव्या ओव्हरमध्ये बुमराहने फक्त दोन धावा दिल्या आणि शेवटच्या दोन ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 20 धावांची गरज होती.
या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट घेतलेला अर्शदीप सिंगने एकोणिसाव्या ओव्हरसाठी बॉल हातात घेतला आणि गोलंदाजीला सुरुवात केली. त्याच्या समोर होता भारताविरुद्ध कसोटी सामन्यात धावा केलेला केशव महाराज, अर्शदीपने अतिशय शिस्तबद्ध मारा करत एकोणिसाव्या ओव्हरमध्ये फक्त चार धावा दिल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 धावा हव्या होत्या.शेवटची ओव्हर टाकण्याची जबाबदारी आयपीएलमध्ये ट्रोल झालेल्या हार्दिक पंड्यावर येऊन पडली आणि हार्दिकने पहिल्याच चेंडूवर दक्षिण आफ्रिकेची शेवटची आस असणाऱ्या डेव्हिड मिलरला आउट केलं.16 धावा हव्या असल्याने डेव्हिड मिलरने लॉन्ग ऑफला चेंडू फटकावला आणि सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर त्याच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा झेल घेतला.हार्दिक पंड्याच्या दुसऱ्या बॉलवर कागिसो रबाडाच्या बॅटची कड घेऊन बॉल सीमारेषेकडे गेला आणि आफ्रिकेला चौकार मिळाला.आता शेवटच्या चार बॉलमध्ये 12 धावांची गरज होती आणि हार्दिकने पुन्हा एकदा डॉट बॉल टाकला आणि चोकर्सचा शिक्का बसलेल्या आफ्रिकेला पराभवाच्या जवळ ढकललं.3 बॉलमध्ये 12 धावांची गरज असताना हार्दिक पंड्याने मिड विकेटला एक धाव दिली आणि शेवटच्या 2 बॉलमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 10 धावा हव्या होत्या. समोर होता केशव महाराज आणि गोलंदाजी करत होता भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्या.हार्दिकने बॉल हातात घेतला, धावपट्टीकडे धाव घेतली आणि एक वाईड बॉल टाकला.आता दोन बॉलमध्ये 9 धावांची गरज होती. हार्दिकने या बॉलवर कागिसो रबाडाला आउट केलं आणि भारताचा विजय निश्चित केला.
2013 नंतर भारत पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकणार होता, गेलेला वर्ल्डकप हार्दिक आणि जसप्रितने भारताच्या हातात आणून ठेवला होता आणि यात अतिशय कंजूस गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीपचाही तेवढाच वाटा होता.कधीकाळी बलाढ्य फलंदाजीसाठी ओळखला जाणारा भारतीय संघ आणि भेदक गोलंदाजीचा जोरावर विश्वविजेता बनला होता.दक्षिण आफ्रिकेचं विश्वविजयाचं स्वप्न मात्र अधुरं राहिलं होतं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!