14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात
पुणे
पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून भीषण अपघात झाला असून 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवल्याची माहिती मिळत आहे. या टँकरच्या धडकेत काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. एक 14 वर्षांचा मुलगा टँकर चालवत होता. त्यानं टँकरनं अनेकांना धडक दिली. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना, तसेच एका दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेलाही या मुलानं धडक दिली आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. नागरिकांनी हा टँकर अडवून धरला असून चालकाला पकडून ठेवलं आहे.
दुचाकीवरून कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी जात होती. त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली. तर, टँकरखाली दोन मुली आल्या. स्वतः ढुमे यांनी या मुलींना बाहेर काढलं. या अपघातात मुलीही जखमी झाल्या आहेत.
पुण्यात कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर देखील अनेक गंभीर अपघात घडत आहेत. एका हायवा ट्रकनं मार्केटयार्ड येथे एका महिलेला चिरडलं होतं. तसेच, कात्रज येथे एसटी बसच्या धडकेत अभियंता तरुणीचा प्राण गेला होता. उंड्री येथे ट्रक दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका तरुणीला जीव गमवावा लागला होता. एका पाठोपाठ एक असे अनेक अपघात घडत असताना देखील अनेक अल्पवयीन मुलं वाहने चालवताना शहरात दिसत आहेत. त्यातच अवजड टँकर अवघ्या 14 वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
