दक्षिण आफ्रिका प्रथमच अंतिम फेरीत
अफगाणिस्तानचं आव्हान संपुष्टात
गयाना
दक्षिण आफ्रिका टीमने इतिहास रचला असून आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली आहे. दक्षिण आफ्रिकेला एकूण 7 वेळा सेमी फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेत आठव्या प्रयत्नात अंतिम फेरीत पोहचण्यात यश आलं.दक्षिण आफ्रिकेचा या नवव्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील हा सलग आठवा विजय ठरला. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानकडून विजयासाठी मिळालेलं 57 धावांचं आव्हान हे 1 विकेट गमावून पूर्ण केलं. अफगाणिस्तानचं या पराभवासह आव्हान संपुष्टात आले
त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानचा संघ 11.5 षटकांत केवळ 56 धावांवर सर्वबाद झाला. या काळात मार्को यानसेन आणि तबरेझ शम्सी यांनी संघाकडून सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने 8.5 षटकांत 1 गडी गमावत 60 धावा करून विजय मिळवला
अफगाणिस्तानने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. अफगाणिस्तानने साखळी आणि सुपर 8 मध्ये न्यूझीलंड- ऑस्ट्रेलिया सारख्या संघांना पराभूत करत इथवर मजल मारली. मात्र अखेर सेमी फायनलमध्ये त्यांचा प्रवास संपला.
या पराभवानंतर अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खान म्हणाला,आमच्या टीमसाठी ही एक आव्हानात्मक रात्र होती. आम्ही कदाचित चांगली कामगिरी करु शकलो असतो, पण परिस्थितीने आम्हाला हवं ते करू दिलं नाही. T20 क्रिकेट हे असेच आहे, तुम्हाला सर्व परिस्थितींसाठी तयार असणं आवश्यक आहे. मला वाटतं की दक्षिण आफ्रिकेने खरोखरच चांगली बॉलिंग केली”,
राशिदने या पराभवानंतर आपल्या गोलंदाजांचीही पाठ थोपटली.”मला वाटतं की या स्पर्धेत आम्हाला चांगले यश मिळाले, कारण सीमर्सनी खरोखर चांगली बॉलिंग केली. मुजीबच्या दुखापतीमुळे आम्ही दुर्दैवी ठरलो. पण आमचे सीमर्स आणि अगदी मोहम्मद नबी यानेही नव्या बॉलस उल्लेखनीय बॉलिंग केली. त्यामुळे फिरकीपटूंनी काम सोपं केलं. आम्ही या स्पर्धेचा आनंद लुटला. आम्ही उपांत्य फेरीत खेळणं आणि आफ्रिकेसारख्या आघाडीच्या टीमकडून पराभूत झालो, हे स्वीकारतो”, असं राशिदने नमूद केलं.
