निष्ठावंत व्यक्तिमत्वांचे महत्व अत्यंत मोलाचे – डॉ. सदानंद मोरे


दादासाहेब साखवळकर पुरस्काराने डॉ. न. म. जोशींचा सन्मान
सातारा
आजच्या राजकारणाची एकूण दिशा अत्यंत चिंताजनक आहे. आयाराम गयाराम या नित्याच्या प्रकारामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब साखवळकर यांच्यासारख्या निष्ठावंत व्यक्तिमत्वाचे महत्व अत्यंत मोलाचे ठरते, महात्मा गांधींच्या प्रत्येक चळवळीत भाग घेत, सातत्याने दीर्घकाळ तुरुंगवास भोगलेला असताना स्वातंत्र्योत्तर काळात सत्तेच्या राजकारणापासून दूर राहून समाजसेवेसाठी स्वतःला झोकून देणाऱ्या दादासाहेब साखवळकरांसारखी ध्येयवादी मंडळी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यांच्या कार्यामुळेच एकसळ गावाचे नाव स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात लौकिकसंपन्न झाले, असे गौरवोद्वार महाराष्ट्रातील थोर विचारवंत व संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी काढले. स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब साखवळकर स्मृति प्रतिष्ठानतर्फे एकसळ येथील मारुती मंदिरात आयोजित जयंतीदिन समारंभामध्ये अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. न. म. जोशी, सुरेश साखवळकर, त्रिपुटी मठाचे प. पू. श्रीपाद महाराज घोलप, लोकमंगल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस प्रतिष्ठानचे अध्यक्ष एम. बी. भोसले, साखवळकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष माणिकराव भोसले उपस्थित होते.
डॉ. सदानंद मोरे पुढे म्हणाले की, लाला लजपतराय यांचे सहकारी डॉ. ना. सु. हडर्डीकर यांनी हिदुस्थानी सेवादल ही संघटना स्थापन केली. तिचे कार्य महाराष्ट्रभर पोहोचविण्यात दादासाहेब साखवळकर व डॉ. वा. वि. आठल्ये यांचाच सिंहाचा वाटा होता. लाहोर काँग्रेसनंतर दादासाहेब साखवळकर हे सरदार भगतसिंगांच्या गावाला गेले, त्यांच्या मातोश्री व बंधूना भेटले व त्यांनी भगतसिंगांचे चरित्र लिहिले त्याचे वाचन सर्वांनी आवर्जून करायला हवे.
डॉ. न. म. जोशी यांना स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब साखवळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने यावेळी डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. एका निष्ठावान व तपस्वी स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाने सन्मान होत असल्याबद्दल डॉ. न. म. जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
सुरुवातीस मानवरांचे हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन झाले. सुरेश साखवळकर यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले. डॉ. मोरे यांच्या हस्ते श्रीमंत पवार, संतोष भोसले, बाळासाहेब फडतरे, मधुकर यादव, पुरुषोत्तम जगताप, नंदकुमार माळवदे, परशुराम सुतार, माणिक भोसले यांचा स्मृतिचिन्हे देऊन सन्मान करण्यात आला. बापूसाहेब भोसले यांनी सूत्रसंचालन तर माणिकराव भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!