तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली
१८ वर्षात तब्बल २१ वेळा बदली
मुंबई
पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदी गतवर्षी बदली करण्यात आलेल्या तुकाराम मुंडेंची पुन्हा एकदा बदली झाली आहे. आता, विकास आयुक्त (असंघटित कामगार) खात्याच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सध्याच्या पदाचा कार्यभार राजेश कुमार यांच्याकडे सोपवण्याच्याही सूचना त्यांना बदली आदेशात देण्यात आल्या आहेत.
राज्यातील सर्वात चर्चेत राहिलेले सनदी अधिकारी म्हणून ज्यांचं नाव डोळ्यासमोर येते ते आयएएस तुकाराम मुंढे तुकाराम मुंढे हे आपल्या धडाडीच्या कामामुळे प्रसिद्ध राहिले आहेत, तर राजकीय नेत्यांसोबत सातत्याने खटके उडाल्याने वादग्रस्त अधिकारी म्हणूनही त्यांनी ओळख राजकीय वर्तुळात आहे.मात्र, तुकाराम मुंढे आणि बदली हे नवं समीकरण राज्यात गेल्या काही वर्षात पाहायला मिळाला आहे.
तुकाराम मुंढेंनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट 2005 मध्ये आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर, विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त आणि सचिवपदी त्यांनी कारकीर्द गाजवली. मात्र, सातत्याने बदली होणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रापुढे आली. जून 2023 मध्ये राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदी त्यांची बदली करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्याअगोदर अवघ्या एका महिन्यापूर्वीच मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली होती. आता, आज पुन्हा त्यांनी बदली करण्यात आली आहे.प्रशासकीय सेवा अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या सहीने तुकाराम मुंडे यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार, राज्याच्या विकास आयुक्त (असंघटित कामगार) सचिवपदी त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. आपल्या धडाकेबाज कामांसाठी प्रसिध्द असलेले आयएएस तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाल्याने ते चर्चेत आले आहेत. तुकाराम मुंढे यांची 18 वर्षाच्या सेवेत जवळपास 21 वेळा बदली झाली आहे. ते 2005 सालच्या आयएसएस बॅचचे अधिकारी आहेत
आयएएस अथवा आयपीएस अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी किमान दोन ते अडीच वर्षे सेवा बजावावी लागते पण तुकाराम मुंढे याला अपवाद ठरत आहेत. आताही एक वर्षातच त्यांची बदली झाली आहे.
