पाक संघावर देशद्रोहाचा गुन्हा
बाबर आझमसह संपूर्ण पाकिस्तान संघ जाणार तुरुंगात
न्यूयॉर्क
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी एकदम निराशाजनक राहिली आहे.आता पाकिस्तानी संघावर आणखी एक संकट कोसळलं आहे. संपूर्ण संघाला जेलची हवा खावी लागू शकते. कारण पाकिस्तानच्या एका वकिलाने सर्व खेळाडूंसह कोच आणि स्टाफवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. पाकिस्तानी संघाने देशासोबत विश्वासघात केल्याचा आरोप वकिलाने केला आहे.
पाकिस्तानच्या गुजरानवाला शहरातील एका वकिलाने बाबर आझमसह संपूर्ण संघावर गुन्हा दाखल केला आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनेलनुसार, वकिलाने याचिकेत स्पष्ट केलं आहे की, अमेरिका आणि भारताविरुद्ध मिळालेल्या पराभवामुळे खूपच वेदना झाल्या आहेत. इतकंच काय तर देशासोबत विश्वासघात करत पाकिस्तानी संघाने अपमार्गाने पैसा कमवल्याचा आरोपही केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून रिपोर्ट जमा करण्याची मागणीही वकिलाने केली आहे. तपासणी पूर्ण होईपर्यंत या संघावर बंदी घालण्याची मागणीही याचिकेत केली आहे. रिपोर्टनुसार ही याचिका ग्राह्य धरली गेली आहे. त्यामुळे पाकिस्तानी संघावर अटकेची टांगती तलवार आहे.
पाकिस्तानचा संघ मायदेशी परतल्यानंतर ही कारवाई होऊ शकते. त्यामुळे सुपर 8 फेरीचं गणित सुटू दे यासाठी पाकिस्तानी संघ प्रार्थना करत असेल. आयर्लंडविरुद्ध अमेरिका हरली तर सुपर 8 फेरीचं गणित सुटू शकतं. त्यामुळे असंच काहीसं व्हावं अशी पाकिस्तानी खेळाडूंची इच्छा असावी. अन्यथा पाकिस्तानी संघाला मायदेशी परतणं खूपच कठीण होईल. पाकिस्तानातील राजकीय स्थिती आणि तिथले कायदे पाहता कधी काय होईल सांगता येत नाही.
