मध्यरात्री पत्नी करायची भूतांना फोन
घाबरून पतीने केला पत्नीचा खून
जयपूर
एक अतिशय धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली. पत्नी फोनवर भूतांशी बोलत असल्याचा संशय आरोपीला होता. प्राथमिक पोलीस तपासात समोर आलं आहे की, आरोपी चुन्नीलालला संशय होता की त्याची पत्नी जिओ देवी (40) हिचा आत्म्यांशी संबंध आहे आणि ती त्यांच्याशी फोनवर बोलायची.घटना राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातून समोर आली आहे.
बुधवारी पहाटे हा खून झाला. जिओ देवी झोपेत असताना चुन्नीलालने कुऱ्हाडीने हल्ला केला. आईचा आरडाओरडा ऐकून 17 वर्षीय मुलगी सुमित्रा घटनास्थळी पोहोचली आणि तिने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र चुन्नीलालने कुऱ्हाडीने वार करत तिला गंभीर जखमी केलं. यावेळी मुलगी सुमित्राही जखमी झाली. आरडाओरडा ऐकून सावध झालेल्या शेजाऱ्यांनी घर गाठलं असता आई आणि मुलगी गंभीर जखमी झाल्याचं दिसलं. त्यांनी पीडितांना जवळच्या रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी जिओ देवी यांना मृत घोषित केलं.सुमित्रावर प्राथमिक उपचार करून तिला घरी सोडण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवी, चुन्नीलाल आणि त्यांची चार मुलं मंगळवारी रात्री एकत्र जेवण करून झोपायला गेले. रात्री अडीचच्या सुमारास चुन्नीलाल उठला आणि त्याने पत्नीवर हल्ला केला. पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांना शेजाऱ्यांचा फोन आला. सुमित्राच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून चुन्नीलालला खुनाच्या आरोपाखाली अटक केली. जिओ देवीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. या घटनेची गावातील लोकांमध्ये चर्चा आहे.
