पाकिस्तानी दहशतवादी काश्मीरमध्ये घुसले
लष्कर सतर्क,लष्करी छावण्या, रेल्वेवर हल्ल्याची भीती
जम्मू
जम्मू-काश्मीरमधील कठुआ-पठाणकोट या भागात सीमेपलीकडून काही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून, ते जम्मू-पठाणकोट महामार्गावरील लष्करी छावण्या, रेल्वे या ठिकाणी आत्मघाती हल्ले करण्याची शक्यता आहे.त्यामुळे सुरक्षा दलांना अधिक सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
पाकिस्तानी ड्रोनची भारताच्या सरहद्दीत घुसखोरी वाढली आहे. त्या कारवायांकडे भारतीय सुरक्षा दलांचे लक्ष वळवून दुसऱ्या बाजूला संधी मिळताच सीमेपलीकडून दहशतवाद्यांची घुसखोरी करायची, असा पाकिस्तानच्या लष्कराचा डाव असल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) सूत्रांनी सांगितले. दहशतवादी सीमेपलीकडून काश्मीरमध्ये घुसखोरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. रेल्वेच्या सुरक्षेसाठीही आणखी जवान तैनात केले जाणार आहेत.
सैदा सुखल या गावात दहशतवाद्यांनी मंगळवारी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या एका गावकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कठुआ जिल्ह्यातील सैदा सुखल या गावामध्ये मंगळवारी रात्री आठ वाजता दोन दहशतवाद्यांनी प्रवेश केला व त्यांनी तेथील गावकऱ्यांकडे पिण्यासाठी पाणी मागितले. या दहशतवाद्यांना पाहून घाबरलेल्या गावकऱ्यांनी सुरक्षा दलाशी संपर्क साधला गावात दहशतवादी शिरले आहेत, ही माहिती मिळताच तिथे सुरक्षा दलाचे जवान तातडीने रवाना झाले. त्यांच्यावर ग्रेनेडने हल्ला करण्याचा दहशतवाद्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला.
