सुनेनेच दिली सासऱ्याच्या हत्येची सुपारी


कोट्यवधींच्या संपत्तीसाठी हिट अँड रनचा बनाव

नागपूर
पुण्यात हिट अँड रन प्रकरण ताजं असतानाच नागपुरातही तसाच प्रकार घडला होता. त्याची देखील शहरात चर्चा होती. पण, या हिट अँड रन प्रकरणानं एक वेगळं वळण घेतलं आहे सूनेनंच सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं. ही सून सरकारी अधिकारी असून तिनं संपत्तीसाठी सासऱ्याला कारनं उडविण्याची सुपारी दिली. यात सासऱ्याचा मृत्यू झाला, असं नागपूर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे.
नागपूर पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आपल्या पत्नीची भेट घेऊन घरी जात होते.22 मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मानेवाडा इथल्या बालाजी नगर परिसरात एका कारनं पुरुषोत्तम पुट्टेवार यांना धडक दिली. यानंतर त्यांना मानकापूर येथील अलेक्सिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथं त्यांचा मृत्यू झाला.मानकापूर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मुलगा आणि आरोपी अर्चना पुट्टेवारचा नवरा मनिष पुट्टेवार यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्यानंतर अजनी पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना सीसीटीव्ही फुटेज मिळालं. त्यावरून त्यांनी हिट अँड रन प्रकरणाची नोंद करून कार चालक निरज निमजेला अटक केली.हे प्रकरण फक्त इथपर्यंतच मर्यादित नाही असा संशय पोलिसांना आला. यात हत्येचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेनं पुन्हा एकदा तपास सुरू केला आणि यात धक्कादायक बाबी समोर आल्या.पोलिस चौकशीत या हत्येची मास्टरमाईंड पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून अर्चना पार्लेवार पुट्टेवार असल्याचं समोर आलं. अर्चना पार्लेवार पुट्टेवार या गडचिरोलीतील नगर रचना विभागात सहाय्यक संचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचा ड्रायव्हर सार्थक बागडेच्या माध्यमातून सासरे पुरुषोत्तम यांना मारण्याची सुपारी दिली.सार्थक बागडेचे मित्र निरज निमजे आणि सचिन धार्मिकला 17 लाख रुपयांत ही सुपारी दिली होती. याच पैशांत अपघातासाठी एक जुनी कार विकत घेतली. त्यानंतर हीच कार निरज निमजेने पुरुषोत्तम यांच्या अंगावर घालून त्यांची हत्या केली, असं सिंगल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पुरुषोत्तम यांची सून अर्चना यांनीच हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी 6 जूनला अर्चनाला अटक केली.आरोपींकडून 17 लाख रुपये आणि एक दुचाकी, हत्येत वापरलेली कार आणि आणखी दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत.सध्या आरोपी आरोप अटकेत असून एका आरोपीला अटक करणार असल्याचं पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी सांगितलं.

Advertisement

अर्चना पार्लेवार-पुट्टेवार या सरकारी अधिकारी आहेत. तरीही त्यांनी माहेरच्या संपत्तीच्या वादातून वृद्ध सासऱ्याचा खून केला.या कुटुंबाचे दोन्ही बाजूने नाते आहे. अर्चना यांची नणंद योगिता या अर्चना यांचे भाऊ प्रवीण यांच्या पत्नी होत्या. प्रवीण यांचा मृत्यू झाला.अर्चना यांचा भाऊ प्रविण पार्लेवारचा योगिता पुट्टेवारसोबत विवाह झाला होता. मृत पुरुषोत्तम पुट्टेवार हे योगिता यांचे वडील होते.प्रविण पार्लेवार यांचा 2007 मध्ये मृत्यू झाला.त्यानंतर योगिता यांनी पार्लेवार कुटुंबाच्या म्हणजे नवऱ्याच्या संपत्तीवर दावा सांगितला.आपल्या मुलीला सासरची संपत्ती मिळावी यासाठी पुरुषोत्तम पुट्टेवार प्रयत्न करत होते. तर आपल्या माहेरची संपत्ती नणंदेला जाऊ नये यासाठी अर्चना प्रयत्नशील होत्या.संपत्तीचा हा सर्व वाद कोर्टात गेला होता.’नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर संपत्ती मिळणार नाही,’ असं आरोपी अर्चनाने तिच्या भावाची पत्नी योगिता यांना बजावलं.योगिता यांना दोन मुली असल्यानं कोर्टात तिची बाजू वरचढ ठरत होती. योगितांच्या वतीनं त्यांचे वडील मृत पुरुषोत्तम पुट्टेवार हेच पूर्ण प्रकरण हाताळत होते. त्यामुळे पुरुषोत्तम यांचाच काटा काढला तर हे संपत्तीच्या वादाचं प्रकरण आणखी कमकुवत होईल.
पुरुषोत्तम गेल्यानंतर योगिताच्या बाजूनं कोणीही लढणारं नसेल असा विचार करत अर्चना यांनी शांतपणे पुरुषोत्तम यांच्या हत्येचा कट रचला असं पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चनाचा भाऊ प्रशांत पार्लेवार जो केंद्र सरकारचा अधिकारी आहे तो देखील या प्रकरणात आरोपी आहे.

पार्लेवार कुटुंबाची संपत्ती फक्त अर्चना आणि प्रशांत दोघांना वाटून घ्यायची होती. यामध्ये त्यांचा मृत भाऊ प्रविण पार्लेवारच्या पत्नी योगिताला हिस्सा द्यायचा नव्हता.त्यामुळे योगिताला या प्रकरणात मदत करणारे तिचे वडील पुरुषोत्तम पुट्टेवार यांचाच काटा काढायचं ठरवलं. अर्चनानं प्लॅन आखला आणि तिला प्रशांत पार्लेवार यांनी मदत केली.या हिट अँड रन अपघातासाठी कार चालक पुरविणे, कार खरेदी करण्यात मदत करणं हे काम प्रशांत पार्लेवार यांनीच केलं. त्यांना अद्याप अटक झालेली नाही.
अर्चनाच्या माहेरी कोट्यवधींची रुपयांची संपत्ती आहे. आतापर्यंत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अर्चनाच्या माहेरी पार्लेवार कुटुंबाकडे जवळपास 22 कोटी रुपयांची संपत्ती आहे. या व्यतिरिक्त आणखी काही संपत्ती आहे का याची शहानिशा पोलीस करत आहेत.यात नागपुरातील मध्यवर्ती भागात उंटखाना परिसरात 5500 स्क्वेअर फुटांचा प्लॉट आणि व्यावसायिक दुकानं आहेत. या प्रकरणात तपास सुरूच असून संपत्तीत आणखी काही भर पडते का? याकडेही पोलिसांचं लक्ष आहे.हीच संपत्ती अर्चना आणि प्रशांत पार्लेवार या दोन्ही सरकारी अधिकारी असलेल्या बहिण-भावाला पाहिजे होती. त्यामुळे त्यांनी योगिताच्या वडिलांच्या हत्येची सुपारी दिली, असे पोलिसांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!