एमसीएचे अध्यक्ष अमोल काळेंचे निधन


न्यूयॉर्कमध्ये आला हृदयविकाराचा झटका
मुंबई
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमोल काळे हे मूळचे नागपूरचे असून त्यांच्या निधनाने क्रिकेट, राजकारण आणि राज्यातील प्रशासकीय वर्तुळाला जबर धक्का बसला आहे.
अमोल काळे हे टी-20 विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. त्यांनी रविवारी पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान सामना पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये हजेरी लावली होती. अमोल काळे यांच्यासह एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक आणि सूरज सामत यांनाही स्टेडियमवर उपस्थित होते. हा सामना पाहिल्यानंतर अमोल काळे हे आपल्या हॉटेलवर गेले. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यावेळी आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अमोळ काळे यांचं परदेशात निधन झाल्यामुळे त्याचं पार्थिव भारतात आणण्यासाठी सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात वेळ लागणं अपेक्षित आहे. सर्व कागदोपत्री औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर त्यांचा मृतदेह भारतात आणण्यात येईल. यानंतर त्यांचा अंत्यविधी नागपूरला किंवा मुंबईला होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
अमोल काळे यांच्याबद्दल सांगायचे झाले तर ते एमसीएचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेश येथील तिरुमला तिरुपती देवस्थानमचे विश्वस्त होते. ऑक्टोबर 2022 मध्ये विश्वचषक चॅम्पियन संदीप पाटील आणि अमोल काळे यांच्यात एमसीए अध्यक्षपदासाठी अटीतटीची लढत झाली होती. एमसीए निवडणुकीत अमोल काळे यांनी पवार-शेलार पॅनलकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. या निवडणुकीत अमोल काळे यांनी संदीप पाटील यांचा पराभव केल्यामुळे त्यांची एमसीए अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. यानंतर अमोल काळे यांनी खेळांडूसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले, त्यातीलच एक म्हणजे मुंबईच्या वरिष्ठ खेळाडूंची मॅच फी दुप्पट करण्याचा निर्णय आहे. आगामी हंगामापासून मॅच फी दुप्पट करण्याचा निर्णय लागू करण्यात येणार आहे. याशिवाय अमोल काळे हे आंध्र प्रदेश येथील तिरुमला तिरुपती देवस्थानम येथे विश्वस्त होते.
अमोल काळे हे देवेंद्र फडणवीस यांचे बालपणीचे मित्र आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे महापौर असताना अमोल काळे हे भाजपाचे वार्ड अध्यक्ष आणि नागपूर महापालिकेत विद्युत कंत्राटदार म्हणून कार्यरत होते. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर अमोल काळे हे सर्वात आधी चर्चेत आले होते. त्या काळात अमोल काळे यांच्या ‘जे. के. सोल्युशन्स’ या कंपनीला शहरातील पथदिव्यांना एलईडी लाइट्‌समध्ये परावर्तित करण्याचे कंत्राट मिळाले होते. या पथदिव्यांमुळे महापालिकेची मोठी आर्थिक बचत होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र वाद झाल्यानंतर काळे यांना कंत्राट मध्येच सोडावं लागलं होतं.
अमोल काळे यांच्याविषयी सांगायचं म्हणजे ते मूळचे नागपूरचे असून ते अभ्यंकर नगर येथे राहतात. अमोल काळे यांचा मुख्य व्यवसाय ईलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होता. यासोबत त्यांचे इतरही व्यवसाय आहेत. अमोल काळे यांच्या परिवाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी सुद्धा जवळचा संबंध आहे. अमोल काळे यांचे आई वडील हे पेशाने शिक्षक होते. ते नागपुरातील नूतन भारत विद्यालयात शिक्षक म्हणून सेवेत होते.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!