विशाल अग्रवालच्या हॉटेलवर कारवाई
विनापरवाना बांधकाम जिल्हा प्रशासनाने केले उद्ध्वस्त
सातारा
पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्या महाबळेश्वर येथील तारांकित हॉटेल एमपीजी क्लबमधील विनापरवाना बांधकाम जिल्हा प्रशासनाने उद्ध्वस्त केले. सकाळी सात वाजता तहसिलदार तेजस्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पालिका पथकाने पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या मदतीने कारवाई केली.
कल्याणीनगर पुणे येथे झालेल्या पोर्शे कार अपघातानंतर या अपघातातील प्रमुख आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर कनेक्शन समोर आले होते. विशाल अग्रवाल यांनी पारशी जीमखाना या ट्रस्टला रहीवासा करीता दिलेली मिळकत विकत घेतली व त्या मिळकती मध्ये आलिशान हॉटेल सुरू केले. त्याच प्रमाणे तत्कालिन पालिकेचे मुख्याधिकारी यांना हाताशी धरून त्या ठिकाणी विनापरवाना सर्व सुविधांनी युक्त आठ कॉटेज बांधले. रहीवासा करीता शासानाने दिलेल्या मिळकतीचा विशाल अग्रवाल यांनी वाणिज्य कारणासाठी वापर सुरू केला व त्या ठिकाणी विनापरवाना बांधकाम केल्याची तक्रार येथील एका माहीती कार्यकर्ता यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. नगरपालिकेकडे देखिल तक्रारी आल्या होत्या दरम्यान पुणे येथील पोर्शे कार अपघातानंतर विशाल अग्रवाल यांचे वादग्रस्त हॉटेल हे चर्चेत आले व जिल्हा प्रशासनाने हॉटेलवर कारवाई सुरू केली. प्रथम या हॉटेल मधील बेकायदेशीर बारला सिल ठोकले. बार बंद केल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३१ मे रोजी संपुर्ण हॉटेलला सील ठोकुन हॉटेल बंद केले. त्याच दिवशी जिल्हा प्रशासनाने हॉटेल व्यवस्थापनास नोटीस दिली होती. हॉटेलमध्ये विनापरवाना बांधण्यात आलेले आठ कॉटेजचे बांधकाम २४ तासांच्या आत काढुन टाकावे अन्यथा प्रशासनाकडून कारवाई करून ते काढून टाकण्यात येईल, असे कळविले होते. हॉटेल सिल केले तेव्हा मालकाच्या वतीने दोन कर्मचारी मिळकतीच्या देखभालीसाठी ठेवण्याची परवानगी प्रशासनाने दिली होती. प्रशासनाने दिलेल्या नोटीस प्रमाणे हॉटेलमधील कॉटेजचे बांधकाम न काढून टाकल्याने प्रशासनाने या हॉटेलवर कारवाईचा निर्णय घेतला.
शनिवारी सकाळी कारवाईचे पथक पोहचले, तेव्हा या मिळकतीमध्ये कोणीही नव्हते तहसिलदार तेजस्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पालिका पथकाने पंचासमक्ष कारवाईला प्रारंभ केला. या कॉटेजमधील काही किमती साहित्य बाहेर काढण्यात आले व त्या नंतर कॉटेजवर जेसीबी चालविण्यात आला. दोन तासात आठ कॉटेजचे बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर पुन्हा हॉटेलला सील ठोकण्यात आलेविशाल अग्रवाल यांच्या एमपीजी क्लब हॉटेलवर आज अखेर तीन वेळा कारवाई झाली. या पुढेही या मिळकतीवर चौथी कारवाईचे प्रशासनाकडून संकेत मिळत आहेत. ही मिळकत लवकरच शासन जमा केली अशी माहीती मिळत आहे. प्रशासनाने घेतलेल्या या भुमिकेमुळे महाबळेश्वर येथे अनेक शासकिय मिळकतींचा गैरवापर करणारांचे धाबे दणाणले आहे. महाबळेश्वरमध्ये अनेक शासकिय भाडेपट्टयाने दिलेल्या मिळकती आहेत. या मिळकतीमधील हेरीटेज बंगल्यामध्ये बिनबोभाट हॉटेल व्यवसाय सुरू झाला आहे. या सर्व मिळकत धारकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
