शेजारच्या देशांना शपथविधीचे विशेष निमंत्रण
8 जूनला नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधानपदाची शपथ
नवी दिल्ली :
लोकसभेचे निकाल लागले असून भाजपकडे इंडिया आघाडीपेक्षा जास्त जागा आहेत. त्यामुळे त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आहे. नरेंद्र मोदी 8 जून रोजी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील.नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी खास शेजारील देशाच्या राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना त्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
विक्रमसिंघे आणि हसीना या दोघांनीही पंतप्रधान मोदींनी दिलेले निमंत्रण स्वीकारलं आहे. 4 जून रोजी भारताच्या 18व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. नवीन सरकारच्या शपथविधीपर्यंत ते सध्याचे कार्यवाहक पंतप्रधान राहतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंका आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांना तसेच नेपाळ आणि मॉरिशस, श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि भूतानचे राजा यांना या आठवड्याच्या अखेरीस त्यांच्या शपथविधीसाठी निमंत्रित केलं आहे. याशिवाय श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि भूतानचे राजा ड्रुक ग्याल्पो जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.याआधी बुधवारी पंतप्रधान मोदी यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केल्यानंतर या सर्व नेत्यांचे आभार मानले. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील एनडीएनं विजय मिळवला. त्यावरुनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया. मेलोनी, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासह 75 हून अधिक जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे
