नरेंद्र मोदी यांचा ८ जूनला शपथविधी
तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन विक्रम नोंदवणार
नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले आहेत. ४०० पारचं भाजपाचं स्वप्न भंगलं आहे, मात्र बहुमत एनडीएला मिळालं आहे. नरेंद्र मोदी ८ जून रोजी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तर त्यांच्यावर नवा विक्रम नोंदवला जाईल. सलग तीनदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा विक्रम हा पंडीत नेहरुंच्या नावावर होता. ज्यानंतर मोदी हे त्या विक्रमाशी बरोबरी करु शकतात. २०१४ मध्ये एनडीएसह भाजपाचं सरकार आलं तेव्हा १० दिवसांनी शपथविधी सोहळा पार पडला होता. तर २०१९ च्या निकालानंतर सात दिवसांनी शपथविधी सोहळा पार पडला होता. आता यावेळी ८ जून रोजी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी शपथ घेण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत एनडीएने भाजपासह २९३ जागा जिंकल्या आहेत. तर इंडिया आघाडीने २३२ जागा जिंकल्या आहेत. त्यांचे सात अपक्ष उमेदवारीही निवडून आले आहेत.
भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता. याआधी भाजपाने २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवलं होतं. यावेळी भाजपाने स्वतः ३७० जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला हात आता आपण जाणून घेऊ भाजपाने २०१४ मध्ये किती जागा लढवल्या आणि २०१९ मध्ये किती जागा लढवल्या? २०१४ मध्ये भाजपाने ४२८ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी २८२ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. तर २०१९ ला भाजपाने ४३६ जागांवर निवडणूक लढवली आणि ३०३ जागा मिळवल्या होत्या. भाजपाने २०१४ आणि २०१९ या दोन्ही वर्षांमध्ये बहुमताच्या संख्येपक्षा जास्त जागा मिळवल्या. आता या खेपेला म्हणजेच २०२४ मध्ये भाजपाने ४४१ जागा लढवल्या आहेत. तर १०२ जागा मित्र पक्षांना दिल्या आहेत.
