बचाव पथकाचीच बोट उलटली
प्रवरा नदीत शोधकार्य सुरु असताना तिघांचा मृत्यू
अहमदनगर
प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीला शोधायला गेलेल्या एसडीआरएफ च्या बचाव पथकाचीच बोट उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात तिघांचा मृत्यू झाला आहे.
उजनी जलाशयात बोट उलटून सहा जण बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ बोट उलटल्याची घटना घडली आहे. प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटली असून पथकातील चार जणांसह एक स्थानिक बुडाल्याने महाराष्ट्र हादरला आहे. प्रवरा नदीत एक व्यक्ती बुडाला होता. त्याचा शोध पथकाकडून सुरु होता. शोधकार्य सुरु असतानाच पथकातील चार जणांसह 1 स्थानिक नागरिक बोट उलटल्याने पाण्यात बुडाले. अकोले तालुक्यातील सुगाव गावा जवळ ही दुर्दैवी घटना घटना घडली आहे. यात एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाला असून तर दोघांचा शोध सुरू आहे.
काल नदीपात्रात दोन जण पोहण्यासाठी आले असता ते दोघेही बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा मृतदेह शोधण्यासाठी एसडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले. एसडीआरएफच्या पथकाकडून सकाळी सहा वाजेपासून शोधकार्य सुरु करण्यात आले. यावेळी दुर्दैवाने एसडीआरएफची बोट पाण्यात उलटली. यात पाच जण बुडाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाचा शोध घेतला जात आहे, असेही हिंगे यांनी सांगितले आहे.
