हरयाणात चालत्या बसला आग
10 जण जिवंत जळाले,अनेक जखमी
चंदिगढ
हरियाणाच्या तावडू उपविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या कुंडली मानेसर-पलवल द्रुतगती मार्गावर भाविकांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग लागली.
यामध्ये बसमधून प्रवास करणारे 10 जण जिवंत जळाले, तर दोन डझनहून अधिक जण गंभीररीत्या भाजले आहेत.जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चालत्या बसमध्ये आग लागल्याचे पाहून स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली.
अपघातात बळी पडलेले पंजाब आणि चंदीगडचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत असून ते मथुरा आणि वृंदावनला भेट देऊन परतत होते. याप्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.या अपघातातील घक्कादायक गोष्ट म्हणजे, बसमध्ये महिला आणि मुलांसह एकाच कुटुंबातील 60 हून अधिक लोक होते, ते सर्व पंजाबचे रहिवासी होते.शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास बसच्या मागच्या बाजूला धुराचा वास आल्याचे वाचलेल्यांनी सांगितले.एका मोटारसायकलस्वाराला बसच्या मागील बाजूस आग लागल्याचे दिसले आणि त्याने बसचा पाठलाग केला. शेवटी त्याने बस थांबवली आणि चालकाला सतर्क केले.दरम्यान या अपघातात बस पूर्णपणे जळून खाक झाली. बसमध्ये ठेवलेले सामान आणि सीट कव्हर जळून खाक झाले होते. पोलिसांनी मृतांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती कळवली आहे.प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळेआग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे
