हिमोफिलिया रुग्णांना साताऱ्यात मार्गदर्शन


इंटास फाउंडेशनतर्फे जिल्हा रुग्णालयात मोफत फॅक्टर वाटप

सातारा
जागतिक हिमोफिलिया दिनानिमित्त येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय आणि इंटास फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सेल्फ-इन्फ्युजन व फिजिओथेरपी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी रुग्णांना फॅक्टर-८ चे मोफत वाटप करण्यात आले. सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ८० रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
हिमोफिलिया हा रक्तस्रावाशी संबंधित गंभीर आजार असून, त्यासंबंधी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील उपक्रमात यानिमित्ताने एक हजार युनिट फॅक्टर-८ चे वाटप करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मेजर राहुलदेव खाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष कदम यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. हिमोफिलिया रुग्णांच्या आरोग्यासाठी डॉ. प्रणिता भोसले यांनी भौतिकोपचारांची माहिती दिली. फॅक्टर घेण्यासंबंधी अधिपरिचारिका कांचन धनावडे यांनी मार्गदर्शन केले.
हिमोफिलिया रुग्णांमध्ये रक्त गोठविणाऱ्या घटकाची कमतरता असते. त्यासाठी आवश्यक फॅक्टर-८ आणि फॅक्टर-९ ही औषधे महाग असल्याने गरीब रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. म्हणूनच इंटास फाउंडेशनतर्फे रुग्णांना फॅक्टर-८ चे निःशुल्क वाटप करण्यात आले. तसेच उपचार प्रक्रियेत रुग्णांना स्वावलंबी बनविण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.
इंटास फाउंडेशनतर्फे प्रकल्प सहायक सूरज माळी, भक्ती केळगणे, प्रवीणा गेडाम, जिल्हा समन्वयक अश्विनी जाधव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ शीतल पोळ यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. वर्ग १ वैद्यकीय अधिकारी डॉ. झेंडे, डॉ. मोहोळकर, डॉ. सोनावणे, डॉ. इनामदार आदी यावेळी उपस्थित होते. हिमॅटोलॉजी विभागप्रमुख डॉ. शुभांगी मोरे यांनी प्रास्ताविक केले. समुपदेशक तेजस्विता दळवी यांनी सूत्रसंचालन केले. अधिपरिचारिका कांचन धनावडे यांनी आभार मानले.

Advertisement

फोटो ओळीः
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मेजर राहुलदेव खाडे यांचे स्वागत करताना हिमॅटोलॉजी विभागप्रमुख डॉ. शुभांगी मोरे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!