चित्रपटगृहात आता क्रिकेट सामने
पीव्हीआर आयनॉक्सतर्फे टी-20 वर्ल्ड कपसाठी योजना
मुंबई
भारतातील सर्वात मोठा सिनेमा ऑपरेटर ‘पीव्हीआर आयनॉक्स’ कंपनीने आता पैसे कमावण्यासाठी क्रिकेटची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी पीव्हीआर आयनॉक्स टी-20 वर्ल्ड कपचे खास सामने दाखवण्याची तयारी करत आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक 2 जूनपासून सुरू होणार आहे.
कोरोना काळात ओटीटीची क्रेझ वाढली. अशा परिस्थितीत प्रेक्षक चित्रपटगृहांपासून दूर राहिले.प्रेक्षकांना घरबसल्या उत्तम कंटेंट पाहता येऊ लागला, परिणामी थिएटर उद्योगाच्या अडचणी वाढल्या.हे पाहता आता पीव्हीआर आयनॉक्सला पैसे कमावण्यासाठी केवळ चित्रपटांवर अवलंबून राहायचे नाही. आर्थिक फायद्यासाठी चित्रपटगृहांमध्ये क्रिकेटचे सामने आणि मैफिली दाखवण्याचाही ते गांभीर्याने विचार करत आहेत.कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी नितीन सूद म्हणाले की, कंपनी पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकाचे महत्त्वाचे सामने थिएटरमध्ये दाखवेल. भारतात अत्यंत लोकप्रिय असलेले टी20 क्रिकेट हे नक्कीच प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करेल, असा त्यांचा विश्वास आहे.
