सेक्स व्हिडीओमुळे त्यांचं जगणं मुश्किल
अनेक महिलांनी घर सोडलं; नवऱ्यांच्याच प्रश्नांनी वैतागल्या
बंगळुरू
कर्नाटकातील जेडीएस नेता प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडल व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणात शिकार झालेल्या महिलांनी घर सोडलं आहे. नवऱ्याश नातेवाईकांनी चारित्र्यावर सवाल केल्याने या महिलांनी अखेर वैतागून घर सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
28 एप्रिल रोजी ज्या महिलेने प्रज्वल यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. ती महिला कुटुंबासह घर सोडून गेली आहे. ही महिला रेवन्ना यांच्या घरी काम करत होती. तिचे काही व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर तिच्या घराला कुलूप लावलेलं दिसलं. ती कुठे गेली, तिच्या कुटुंबाचं काय झालं? आम्हाला काहीच माहिती नाही, असं शेजाऱ्यांचं म्हणणं आहे.
प्रज्वल यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या एका माजी जिल्हा पंचायत सदस्याच्या गावचेही असेच हाल आहेत. एका स्थानिक जेडीएस नेत्याने याबाबत मौन सोडलं. तो म्हणाला की, पक्षातील महिला कार्यकर्त्या, नेत्या आणि पदाधिकारी प्रज्वल रेवन्ना यांच्यासोबतचे फोटो डिलीट करत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. काही प्रकरणात नवरेच आपल्या पत्नीवर संशय घेत असून खासदाराशी असलेल्या संबंधाबाबत विचारत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अनेक महिलांचं आयुष्य बरबाद झालं आहे.
सेक्स स्कँडलचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक महिलांची ओळख पटली आहे. त्यामुळे या महिलांनी हासन सोडून दुसरीकडे आश्रय घेतला आहे. एसआयटी जेव्हा हासनमध्ये चौकशीसाठी गेली, तेव्हा अनेक कार्यकर्त्यांनी धक्कादायक माहिती दिली. व्हिडीओतील महिलांना आम्ही ओळखतो. त्या इथेच राहतात. त्या पक्षात सक्रिय होत्या. पण आता त्यांच्या घराला कुलूप आहे. त्यांची लहान लहान मुलेही आहेत, असं हे लोक सांगत आहेत.
दरम्यान, सेक्स स्कँडलमधील महिलांचे चेहरे समोर आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महिलांचे चेहरे दाखवणं योग्य नाही. हे चुकीचं आहे. आता त्या महिला गायब झाल्या आहेत. त्या कधी येतील हे माहीत नाही. या कुटुंबाला गुन्हा दाखल करायचा नव्हता. कारण रेवन्ना यांच्या विरोधात जाऊन हासनमध्ये राहणं मुश्किल आहे, असं एका दुकानदाराने सांगितलं.
