13 ठिकाणी ठाकरे विरुद्ध शिंदे गटात थेट लढत
मुंबईतील लढतींकडे विशेष लक्ष
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपात भाजप – 28, शिवसेना – 15, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला – 4 तर महादेव जानकर यांच्या रासपला एक जागा मिळाली आहे.या जागावाटपात गेल्या निवडणुकीत मिळालेल्या जागा कायम राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले आहे या जागावाटपानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार राज्यात 13 जागांवर ठाकरे गट आणि शिंदे गट अशी थेट लढत होणार आहे.
मविआ आणि महायुतीचे जागावाटप निश्चित झाले आहे. त्यानुसार राज्यात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या 15 जागा मिळाल्या आहेत तर ठाकरे गटाला 21 जागा मिळाल्या आहेत. या लढतींचा विचार केल्यास शिंदे आणि ठाकरे यांच्यात 13 ठिकाणी थेट लढती होणार आहेत. यात मुंबईतील लढती प्रमुख मानल्या जात आहेत.मुंबईतील दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या तीन महत्त्वाच्या जागांवर शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे आणि कल्याणात देखील शिंदे विरुद्ध ठाकरे अशाच लढती होणार आहेत.दक्षिण मुंबईत विद्यमान खासदार आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अरविंद सावंत यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे, तर तिथे त्यांना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचे आव्हान असेल. दक्षिण मध्य मुंबईत उद्धव गटाने राज्यसभेचे माजी खासदार अनिल देसाई यांना तिकीट दिले आहे. तिथे त्यांना विद्यमान खासदार आणि शिंदे गटाचे नेता राहुल शेवाळे यांनी आव्हान दिले आहे.उत्तर पश्चिम मुंबईत ईडी चौकशीचा ससेमिरा मागे लागलेल्या अमोल कीर्तिकर यांना उद्धव गटाकडून तिकीट देण्यात आले आहे, तर तिथे उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणाऱ्या मात्र, ईडी चौकशीनंतर शिंदे गटात गेलेल्या रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे यांनी संधी दिली आहे.
याशिवाय, मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात उद्धव गटाने विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर तिथे नरेश म्हस्के हा तुलनेने नवखा उमेदवार शिंदे गटाने दिला आहे. तर कल्याणमध्ये विद्यमान खासदार आणि शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या तुलनेने नवीन असलेल्या वैशाली दरेकर – राणे यांचे आव्हान असेल.अगदी शेवटपर्यंत उत्सुकता ताणून ठेवलेल्या नाशिक मतदारसंघाचा उमेदवार अखेर महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत जाहीर करण्यात आला. तिथे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच शिंदे गटाकडून संधी देण्यात आलेली आहे. त्यांच्यासमोर ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांचे आव्हान असेल
याव्यतिरिक्त अन्य सात ठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरे असाच सामना रंगणार असल्याचे दिसते आहे. यात मावळ, शिर्डी, औरंगाबाद, यवतमाळ -वाशीम, बुलढाणा, हातकणंगले आणि हिंगोली या मतदारसंघांचा समावेश आहे. शिंदे गटाला राज्यात एकूण 15 जागा मिळाल्या आहेत. 13 जागांवर ठाकरे गटासोबत थेट सामना आहे. तर उर्वरित दोन ठिकाणी काँग्रेससोबत त्यांची लढत होणार आहे. यात एक महत्त्वाची जागा आहे ती कोल्हापूरची. इथे शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना थेट शाहू महाराज यांचे आव्हान आहे.शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर दुसरी जागा आहे, रामटेकचे. जिथे काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या राजू पारवे यांना तिकीट देण्यात आले आहे. कृपाल तुमाने यांना संधी नाकारत शिंदे गटाने या आयात उमेदवाराला उमेदवारी दिली. काँग्रेसच्या शाम बर्वे यांचे त्यांना आव्हान असेल
