श्री दत्तात्रेय अवतारांची प्रमुख मुळ दत्त तिर्थक्षेत्रे.
भाग १

माहूर(नांदेड)महाराष्ट्र
हे क्षेत्र सद्गुरु दत्तात्रेयांचे अवतार स्थान आहे.महासती अनुसयेच्या सत्व परिक्षेसाठी आलेल्या ब्रह्मा,विष्णू आणि महेश यांनी संतुष्ट होऊन महासती अनुसया आणि अत्री ऋषी यांच्या विनंतीस मान देऊन याच ठिकाणी त्यांच्या पुत्राच्या रूपाने दत्त अवतार धारण केला.हे क्षेत्र फार प्राचीन आहे.ह्या क्षेत्रास दत्तात्रेयांचे विश्रांती स्थान सुध्दा म्हणतात.ह्या ठिकाणी रेणुका मातेचे मूळ शक्ती पीठ सुध्दा आहे.हे स्थान नांदेड जिल्ह्यात येते.नांदेड पासून ११० किमी अंतरावर माहूर हे क्षेत्र आहे. पुण्या,मुंबई कडील भक्तां साठी औरंगाबाद, जालना, मेहकर, वाशीम,पुसद,माहूर अशी सरळ बससेवा आहे.नांदेड हे मनमाड-हैदराबाद मार्गावरचे महत्त्वाचे रेल्वे-स्टेशन आहे.या ठिकाणी निवासासाठी भक्त निवास आहे.

गिरनार(जुनागड)(सौराष्ट्र गुजरात)
हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागड जिल्ह्यात येते.जुनागड या शहरा पासून हे स्थान २ किमी अंतरावर आहे.याच ठिकाणी श्री सद्गुरु दत्तात्रेयांनी गोरक्षनाथास अनुग्रह दिला.हे स्थान उंच पर्वतावर असून या ठिकाणी जाण्यासाठी ९९९९ पायरया चढून जाव्या लागतात.ह्या ठिकाणी सद्गुरु दत्तात्रेयांच्या पादुका स्थापित आहेत.इथे नेहमी दत्तात्रेयांचा निवास असतो याचा प्रत्यय भक्तांना नेहमी येतो.या ठिकाणी जाण्यासाठी सुरत, बडोदा, अहमदाबाद या शहरातून जुनागड (गिरनार)साठी नियमीत बससेवा आहे.रेल्वे-मार्गाने जाण्यारया भक्तांसाठी सुरत, अहमदाबाद, राजकोट, जुनागड अशी रेल्वे सेवा आहे.या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत.

पिठापूर – (पूर्व गोदावरी जिल्हा) आंध्रप्रदेश
हे क्षेत्र श्री दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी पहिला अवतार असलेले श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मगाव आहे.या क्षेत्रास पादगया सुध्दा म्हणतात.आंध्र प्रदेशमधे पूर्व गोदावरी जिल्ह्यात काकिनाड्या जवळ हे क्षेत्र आहे.आपस्तंब शाखेतील आपलराज,आणि सुमती माता या ब्राह्मण दांपत्यांच्या उदरी श्रीपादांचा जन्म झाला.सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी श्राध्दकर्मासाठी आलेल्या ब्राह्मणांच्या भोजनाच्या अगोदर सुमती मातेने दत्तात्रेयांना भिक्षा वाढली.त्यामुळे संतुष्ट होऊन श्री दत्तात्रेयांनी मी तुझ्या उदरी जन्म घेईल असा आशिर्वाद सुमती मातेस दिला.जीवनात एक वेळेस या क्षेत्रास जाऊन श्रीपाद वल्लभांचे दर्शन जरूर घ्यावे. हैद्राबाद, विशाखापट्टनम या मार्गावर सामलकोट हे रेल्वे स्टेशन लागते तिथे उतरून रिक्षा अथवा बसने (१०किमी) अंतरावर असलेल्या पिठापूर या क्षेत्राला जाता येते.या ठिकाणी जाण्यासाठी सिकंदराबाद रेल्वे स्थानकांवरून नियमीत रेल्वे आहेत.शिर्डी, विशाखापट्टनम,काकिनाडा एक्सप्रेस या रेल्वे गाडया मराठवाडयातून पिठापूरला जाण्यासाठी सोईस्कर आहेत.पुण्या-मुंबईच्या लोकांसाठी मुंबई भुवनेश्वर(कोणार्क एक्सप्रेस),तर विदर्भातील लोकांसाठी दक्षिण किंवा ओखा- पुरी एक्सप्रेस ही ह्या रेल्वेगाडया सोयीच्या आहेत.या ठिकाणी राहण्यासाठी भक्त-निवास असून दुपारी १२ वाजता आणि रात्री ८ वाजता महाप्रसादाची व्यवस्था आहे.पिठापूरला जाणारया भक्तांनी १५ दिवस अगोदर आपली पिठापूरला जाण्याची तारिख संस्थानला फोनने कळ्वावी.जेणेकरून तिथे गेल्यावर रूम मिळ्ण्यास अडचण निर्माण होणार नाही. श्री श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानम पिठापूरम- फोन नं.-(०८८६९) २५०३००,२५२३००.

कुरवपूर(जि.रायचूर)कर्नाटक
हे क्षेत्र कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावर आहे. या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे.या क्षेत्री श्रीपाद वल्लभांनी १४ वर्षे वास्तव्य केले.श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती(टेंबेस्वामी) यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अठरा अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला.याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे.याच ठिकाणी पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला. मुंबई,बंगलोर(व्हाया गुलबर्गा)या रेल्वे मार्गावर रायचूर हे रेल्वे स्टेशन लागते.तिथे उतरून रायचूर बसस्थानका वरून बस मार्गाने ३०किमी अंतरावर अतकूर हे गाव लागते.तिथे जवळ्च कृष्णा नदीचा तीर लागतो.होडिने १ किमी प्रवास करून मंदिरा पर्यंत जाता येते.दुसरा मार्ग रायचुर-हैद्राबाद या बस मार्गावर मतकल नावाचे गाव लागते तिथे उतरून रिक्षाने किंवा बसने १६ किमी अंतरावर असलेल्या पंचदेव पहाड या कृष्णा नदीच्या तिरावर असलेल्या गावास जावे लागते.नंतर होडिने प्रवास करून १ किमी अंतरावर मंदिरा पर्यंत पोहोचता येते.हा मार्ग अधिक सोयीचा आहे.पंचदेव पहाड या गावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी वल्ल्भपूरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे.या आश्रमात निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे.स्वत:च्या गाडीने कुरवपूरला जाणा~यांसाठी या आश्रमात
गाडी पार्किंगची व्यवस्था आहे.वल्लभपूरम या आश्रमात श्री श्रीपाद वल्लभ स्वामींचा दरबार आहे.याच ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सूर्य नमस्कार घालण्यासाठी येत असत.याच्या खुणा आजही पाहावयास मिळतात.कुरवपूरला राहण्यासाठी ३-४ खोल्या आहेत व पुजा~यांना भोजना साठी आधी सांगावे लागते. वासुदेव भट्ट पुजारी,श्री क्षेत्र कुरवपूर,जि.रायचूर.फोन नं.-(०८५३२-२८०५७०)
मोबाईल नं.-०९७३१८२७५४६,०९७४०३१३८२८

लाड कारंजा(दत्त)(वाशिम)महाराष्ट्र
हे क्षेत्र दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी दुसरा अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे जन्मगाव आहे.आजही स्वामींचा ज्या वाड्यात जन्म झाला तो वाडा चांगल्या स्थितीत असून याच वाड्यात श्री योगिराज वासुदेवानंद सरस्वती(टेंबे स्वामी) यांना श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा साक्षात्कार झाला होता.त्या वाड्यामधे आजही स्वामींचे अस्तित्व जाणवते.हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे की ज्या ठिकाणी बाल स्वरूप श्री नृसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती आहे.इतर क्षेत्री स्वामींच्या पादुका आहेत.श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या आज्ञेनुसार (लिलादत्त) श्रीपत ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराजांनी या मंदिराची १९३४ साली स्थापना केली.वाशीम,अमरावती,अकोला,यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणा पासून कारंजा हे ६० किमी अंतरावर असून या शहरातून कारंजा साठी नियमीत बस सेवा आहे.मुंबई-हावडा या रेल्वे लाईनवर असलेल्या मूर्तिजापूर या रेल्वे स्टेशन वर उतरून बसमार्गाने ३० किमी अंतरावर कारंजा या क्षेत्रास जाता येते.इथे निवासासाठी भक्त निवास असुन दुपारी १ वाजता महाप्रसादाची सोय आहे. गुरुमंदिर कारंजा- फोन-(०७२२६) २२४७५५, २२२४५५

नृसिंहवाडी-(कोल्हापूर,महाराष्ट्र)
-हे क्षेत्र कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर अंदाजे ७०० वर्षां पूर्वी वसले असून सद्गुरु दत्तत्रेयांचा द्वितीय अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी म्हणून हे क्षेत्र ओळ्खले जाते.श्री नृसिंह सरस्वती स्वामी या क्षेत्री १२ वर्षे;राहिले.आपल्या अवतार कार्यामध्ये स्वामींनी अनेक अवतार लीला केल्या आहेत. त्यापैकी गुरु चरित्रातील प्रसंगांपैकी अमरापूर गावी घेवड्याचा वेल उपटल्याची कथा आहे.(नृसिंह वाडी पैलतीरी)बिदरच्या मुस्लिम राजाच्या मुलीची गेलेली दृष्टी स्वामींनी आशिर्वाद देऊन परत आणली त्याची उतराई म्हणून विजापूर बिदर बादशहाने सध्याचे मंदिर बांधले आहे.कृष्णा नदीच्या पलीकडच्या तीरावर योगीराज वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांचे परमप्रिय शिष्य श्री नृसिंह सरस्वती (दिक्षीत स्वामी) यांनी स्थापन केलेले श्री दत्त अमरेश्वर मंदिर,वासुदेवानंद सरस्वती पीठ आणि यक्षिणी मंदिर आहे.त्याचा जिर्णोध्दार विद्या वाचस्पती दत्त स्वरूप श्री दत्त महाराज कवीश्वर यांनी करून कृष्णा नदीवर सुंदर घाट बांधला आहे. नृसिंह वाडीला गेल्यास दत्त अमरेश्वर मंदिरात अवश्य जावे.हे क्षेत्र कोल्हापूर पासून पूर्वेस ५० किमी. अंतरावर आहे.सांगली या जिल्ह्याच्या ठिकाणा पासून २२ किमी. अंतरावर दक्षिणेस हे क्षेत्र आहे.सांगली बस स्थानकावरून या क्षेत्री जाण्यासाठी नियमित बस सेवा आहे. सांगली- कुरूंदवाड बसने सुध्दा इथे जाता येते.सांगली हे कोल्हापूर-मुंबई मार्गावरचे महत्त्वाचे रेल्वे-स्टेशन आहे.इथे निवासासाठी देवस्थानचे भक्त-निवास आहे.दुपारी १२ वाजता महाप्रसादाची सोय आहे.काही वर्षांपूर्वीच दत्तभक्त शरद उपाध्ये यांनी या ठिकाणी “वेदभवन”या वास्तुचे निर्माण केले आहे. ही वास्तु सुध्दा अवश्य पाहावी. श्री नृसिंह सरस्वती दत्त संस्थान,श्रीनृसिंहवाडी,तालुका शिरोळ,जिल्हा कोल्हापूर फोन-(०२३२२),२७००६४,२७०००६,२७०५०१

औदुंबर:-(सांगली,महाराष्ट्र)
सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी काठी वसलेले औदुंबर हे दत्त क्षेत्र भारतातील अनेक दत्त स्थानापैकी प्रमुख दत्त क्षेत्र आहे. श्री दत्त संप्रदायात या क्षेत्राचे विशेष महत्त्व आहे.या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वास्तव्य अल्प म्हणजे एक चातुर्मास पुरते होते. कोल्हापूरच्या मूढ पुत्राला येथे स्वामींच्या आशिर्वादाने ज्ञान प्राप्ती झाली ही कथा गुरु चरित्राच्या १७ व्या अध्यायात आलेली आहे.याच ठिकाणी संत जनार्दन स्वामी,श्री संत एकनाथ महाराज यांना दत्त दर्शन झाले. याच ठिकाणी स्वामींनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला व माझा नित्य त्या वृक्षामध्ये निवास राहील व त्या वृक्षाची नियमीत पूजा किंवा त्या वृक्षाखाली गुरु चरित्र पारायण करणारया भक्तास त्याने केलेल्या पुजेचे अगर पारायणाचे फळ हजार पटीने मिळेल.त्या भक्ताला माझा आशिर्वाद राहील,असे वचन दिले. औदुंबर या ठिकाणी जाण्यासाठी सांगली बस स्थानकावरून नियमीत बस सेवा आहे.सांगली- अंकलखोप या बसने इथे जाता येते.तासगाव- कोल्हापूर या बसमार्गावर हे क्षेत्र आहे.रेल्वे मार्गांनी प्रवास करणारया भक्तांसाठी पुणे,कोल्हापूर मार्गावर भिलवडी स्टेशन लागते.त्या स्टेशनवरून उतरून बस मार्गाने (७ किमी) अंतरावर असलेल्या औदुंबर या क्षेत्रास जाता येते.या ठिकाणी राहण्यासाठी जोशी अगर पुजारी यांचे घरी सोय होऊ शकते.श्री दत्त संस्थान औदुंबर तालुका पुलुस जिल्हा सांगली फोन रामभाऊ पुजारी (०२३४६)२३००५८,९९७०१२९७१३,

गाणगापूर(गुलबर्गा,कर्नाटक)
-गाणगापूर हे क्षेत्र मनुष्य रूपी दत्तात्रेयाचा द्वितीय अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी आपल्या तेवीस वर्षाच्या प्रदिर्घ वास्त्वयासाठी का निवडले या घटनेमागे मोठा अर्थ आहे.भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमाच्या आसपासचा २ ते ३ मैलाचा परिसर विविध कारणांनी पवित्र झाला आहे.या ठिकाणी पौराणिक काळातील विभूतींनी तपश्चर्या करून,यज्ञ करून आणि काही काळ वास्तव्य करून हा प्रदेश परमपवित्र आणि मंगल कारक केला आहे.या क्षेत्री माधुकरी मागण्याचे फार महत्त्व आहे.दत्त भक्तांची अशी भावना आहे की,आज ही दुपारी १२ वाजता श्री नृसिंह सरस्वती भिक्षा मागण्यास गाणगापूरला येतात.येथील मंदिरात स्वामींच्या निर्गुण पादुकांची स्थापना केलेली आहे.हे क्षेत्र दत्त संप्रदायामधे फार महत्त्वपूर्ण आहे.मुंबई हैद्राबाद(व्हाया सोलापूर) किंवा मुंबई-बंगलोर या रेल्वे मार्गावर गाणगापूर रोड स्टेशन लागते.तिथे उतरून बस किंवा ऑटोने २० किमी. अंतरावर गाणगापूर या क्षेत्रास जाता येते.बस मार्गाने सोलापूर-गाणगापूर अशी थेट बससेवा आहे.या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत व भोजनासाठी अन्नछ्त्र मंडळात सोय होऊ शकते.श्री दत्त संस्थान गाणगापूर फोन नं-(०८४७२) २७४३३५,२७४७६८

