नाशिकमधून शिवसेनेचे हेमंत गोडसे


कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे,ठाण्यातून नरेश म्हस्के
मुंबई
शिवसेनेच्या शिंदे गटाने ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील त्यांचे उमेदवार जाहीर केले. पाठोपाठ आता नाशिकचा उमेदवारही जाहीर केला आहे. शिंदे गटाने कल्याणमधून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. तर ठाण्यातून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे महायुतीचे (शिंदे गट) लोकसभेचे उमेदवार आहेत.
दरम्यान, नाशिकच्या जागेबाबत निर्णय घेण्यासाठी महायुतीने अनेक दिवस खलबतं केल्यानंतर ही जागा शिंदे गटाला देण्यात आली आहे. शिंदे गटाने नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा नाशिकमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. नाशकात हेमंत गोडसे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचं आव्हान असणार आहे. महायुतीने राज्यातील ४८ पैकी ४७ जागांवरील त्यांचे उमेदवार जाहीर केले असून आता केवळ पालघरच्या जागेबाबतचा निर्णय घेतलेला नाही. नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोनच दिवस उरले आहेत. त्यमुळे हेमंत गोडसे उद्या (२ मे) नाशकात शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरू शकतात.
ठाण्याच्या जागेसाठी भाजपा इच्छुक आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. तसंच कल्याणमध्येही काय घडतं त्याबाबत चर्चा होत होत्या. अखेर शिवसेनेचे दोन्ही बालेकिल्ले आपल्याकडे ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) नेते आणि राज्याचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक होते. मात्र नाशिकची जागादेखील शिंदे गटाने मिळवली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी काही प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत नरेश म्हस्केंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. या बैठकीत नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे यांचा सहभाग होता. उमेदवार निवडण्याची चर्चा या बैठकीत पार पडली. त्यानंतर नरेश म्हस्केंच्या नावाबाबत एकमत झालं. या बैठकीत नाशिक लोकसभेबाबतही निर्णय घेण्यात आला.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!