४० वर्षात ६९ मुलांना जन्म
महिलेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
मॉस्को :
एका महिलेनं 40 वर्षांत 69 मुलांना जन्म दिला.या महिलेबाबत समजल्यानंतर खरंतर तुम्हीच काय डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले आहेत.
पण या महिलेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येसुद्धा आहे.
रशियाच्या शुया भागात राहणारी ही महिला मॉस्कोतील निकोल्स्क एका मठाशी संबंधित होती. या मठानं रशियन सरकारला दस्तावेज सादर केलं. ज्यात या महिलेच्या प्रेग्नन्सीबाबत माहिती देण्यात आली आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार आजपर्यंत कोणालाही 16 पेक्षा जास्त मुले झाली नाहीत. त्यामुळे एका महिलेने एवढ्या मुलांना जन्म देण्याची कल्पना अशक्य वाटू शकते, परंतु मठांनी दिलेल्या अहवालात याचा संपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. तिच्या पतीचं नाव फ्योडोर वासिलिव्ह असल्याचं मठाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
मॉस्कोमधील निकोल्स्क मठानं दिलेल्या माहितीनुसार, 1725 ते 1765 दरम्यान फ्योडोर वासिलिव्हची पत्नी 27 वेळा गर्भवती झाली. या काळात तिला 16 वेळा जुळी, 7 वेळा तिळी झाली आणि 4 वेळा तिनं एकाच वेळी चार मुलांना जन्म दिला. म्हणजेच एकाच महिलेच्या पोटातून एकूण 69 मुलं जन्माला आली.
फ्योडोरनं आणखी एका महिलेशी लग्न केलं. ती 8 वेळा गरोदर राहिली आणि तिनं 18 मुलांना जन्म दिला. यापैकी 6 वेळा जुळी मुलं जन्माला आली. जर आपण या प्रकारे पाहिलं तर वासिलिव्हच्या दोन पत्नींना एकूण 87 मुलं जन्माला आली. त्यापैकी 84 जिवंत राहिली, उर्वरित ३ मुलांचा जन्मानंतर काही दिवसांनी मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं.
त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावांची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. परंतु काही लोकांचा असा दावा आहे की पहिल्या पत्नीचं नाव व्हॅलेंटिना वासिलिव्ह होतं आणि ती 76 वर्षे जगली. जेव्हा तिच्या मुलांची कागदपत्रं सरकारला देण्यात आली तेव्हा ती जिवंत होती आणि तिचं वय 75 वर्षे होतं.ही महिला तिच्या आयुष्यात एकूण 27 वेळा गरोदर राहिली आणि बहुतेक वेळा तिनं जुळी, तिळी किंवा चार मुलांना जन्म दिला. सर्वाधिक मुलांना जन्म देण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तिच्या नावावर आहे.
