फडणवीस पवारांना पुरून उरले
सदाभाऊ खोत यांचे वक्तव्य
कोल्हापूर
शरद पवारांसारख्या माणसाला एकच व्यक्ती पुरुन उरला आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. म्हणूनच शरद पवारांसारख्या माणसाला देवेंद्र फडणवीस यांची जात काढावी लागते असे वक्तव्य कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना महायुतीतल्या रयत क्रांती पक्षाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.
“७० वर्षांपासून महाराष्ट्रात मूठभर सरदारांचं राज्य होतं. या सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळेच शरद पवारांसारख्या नेत्याला त्यांची जात काढावी लागते. पण पवार तुमची जात वेगळी असती, तुमचं आडनाव फडणवीस असतं तर महाराष्ट्रात तुम्हाला कुणी हुंगलंही नसतं. मात्र देवेंद्र फडणवीस हा एकच बाप असा आहे जो शरद पवारांना पुरुन उरला. त्यामुळे या वयातही शरद पवारांना खोटं बोलत रेटून चालावं लागतं आहे.”असे खोत यांनी म्हटले आहे
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठे यश संपादन होईल, असं चित्र निर्माण झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराने मंतरलेला प्रदेश आहे. महापुरुषांचे नाव घेणारी माणसं सध्या वाड्यामध्ये आहेत. आत्ताची लढाई ही वाडा विरुद्ध गावगाडा अशी आहे. या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून हे सगळे वाडे उध्वस्त होणार आहेत. रयतेचा विजय निश्चितपणे होणार आहे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितलं
