पत्नी आणि मुलीची झोपेतच हत्या
पत्नी नांदत नसल्याने पतीचे कृत्य
अकोला
पत्नी नांदायला येत नसल्याचा राग मनात धरुन पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीसह ९ वर्षांच्या मुलीची कुऱ्हाडीने सपासप वार करुन हत्या केली. ही धक्कादायक घटना अकोला शहरात घडली.
ही धक्कादायक घटना अकोला शहरातील रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.रश्मी म्हात्रे (वय २७) आणि माही म्हात्रे (वय ९) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मनीष म्हात्रे (वय ३०) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी मनीष आणि रश्मी यांच्यात नेहमी वाद होत होता.पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून रश्मी माहेरी निघून गेली होती. पत्नी सासरी नांदायला येत नसल्याचा राग पतीच्या मनात होता. पती मनीष म्हात्रे हा अनेकदा पत्नीला भेटीसाठी तिच्या माहेरी जात होता. परंतु मनधरणी करुनही पत्नी सासरी नांदायला येण्यास नकार देत होती.मंगळवारी (ता. २३) म्हात्रे कुटुंबात लग्न असल्याने रश्मी आणि मुलगी माही हे दोघेही जण अकोल्यात सासरी आले होते. रात्री उशिराही मनीषनं पत्नीला सासरी राहायला ये असे म्हटले पण तिने नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी मनीषने गाढ झोपेत असलेल्या पत्नीसह मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला केला.या घटनेत दोघींचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यासोबतच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. या प्रकरणात खुनाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिकचा तपास पोलीस निरीक्षक मनोज बहुरे करीत आहेत.
