उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगावर ताशेरे


मशाल गीतातील शब्दांना आक्षेप घेतल्याने संताप

Advertisement

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेठाकरे गटाने मागील आठवड्यात प्रचारासाठी तयार केलेले मशाल गीत प्रसिद्ध केले.त्यांच्या या मशाल गीतातील हिंदू धर्म, आणि जय भवानी हे दोन शब्द काढून टाकावे, असे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. याबाबत आता ठाकरेंकडून निवडणूक आयोगावरच ताशेरे ओढण्यात आले असून त्यांनी या संदर्भातील एक व्हिडीओ पत्रकार परिषदेत दाखवत निवडणूक आयोगाला प्रश्न उपस्थित केले आहेत.
निवडणूक आयोगाकडून प्रचार गीतातील दोन शब्द काढण्याची नोटीस आल्यानंतर उद्धव ठाकरे संतापले आहेत. त्यांनी या संदर्भातीलच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबतचा एक व्हिडीओ पत्रकार परिषदेत दाखवला. यामध्ये नरेंद्र मोदी बजरंग बली की जय, असे बोलून बटण दाबा, अशी बोलतानाची ऑडिओ क्लिप ऐकवली. अमित शहा यांनी आमचे सरकार आणल्यावर प्रभू श्रीरामाचं दर्शन मोफत करु, बोलतानाची ऑडिओ क्लिप ऐकवली. यानंतर आधी मोदी-शहांवर कारवाई करा, असे आव्हान देखील उद्धव ठाकरेंनी दिले.
तर, नरेंद्र मोदी आणि अमित शहांना हवे ते बोलता येते मग आम्हाला का नाही ? मोदी, शहांना वेगळे नियम लागू होतात का?, असे म्हणत आम्ही जय भवानी म्हणणारच, असे ठाम मत उद्धव ठाकरेंनी यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडले. तसेच, अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाच्या नावावर मते मागतात. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. त्यावर अद्याप निवडणूक आयोगाचे उत्तर आले नाही, अशी माहिती उद्धव ठाकरेंकडून देण्यात आली.
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा हिंदू धर्मावर मते मागतात. आम्ही हिंदू धर्माच्या आधारावर मत मागितले नाही. निवडणूक आयोगाने यावर उत्तर द्यावे, जर आमच्यावर कारवाई करायची आहे तर मोदी-शहांवर देखील कारवाई करावी लागेल. जय भवानी शब्द काढा, अशी आम्हाला निवडणूक आयोगाकडून नोटीस मिळाली. आम्ही जय भवानी म्हटले तर धार्मिक प्रचार होतो, मग मोदी, शहा जय बजरंगबली म्हणतात, ते कसे चालते?, असा संतप्त सवालही उद्धव ठाकरे यांच्याकडून विचारण्यात आला आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!