जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म
हिंदू पुराणातील ‘वासुकी’ तो हाच का याबाबतचे संशोधन
अहमदाबाद
हिंदू पौराणिक कथांमध्ये वासुकी नागाला मानाचे स्थान आहे. मंदारांचल पर्वताला वेटोळे घालून या भल्या मोठ्या नागाच्या दोन्ही बाजुंना दोरीसारखं पकडून समुद्रमंथन करण्यात आले.यासारख्या कल्पना केवळ पुराणांमध्येच शोभतात असे म्हणणाऱ्या अनेकांना चकित करणारे एक संशोधन समोर आले आहे. चक्क अभ्यासकांनी वासुकी नागाचाच शोध लावला आहे. ४७ दशलक्ष वर्षांपूर्वी भारतात वावरणाऱ्या भल्या मोठ्या नागाचा शोध संशोधकांनी लावला आहे. या नागाचे नामकरण हिंदू पौराणिक कथांमधील वासुकी या प्रसिद्ध पौराणिक नागावरून ‘वासुकी इंडिकस’ असे करण्यात आले आहे. ५० फूटांपेक्षाही लांब, आणि आतापर्यंत नोंद केलेल्या भल्यामोठ्या अजगारांनाही लाजवेल असे या नागाचे वर्णन करण्यात येत आहे.
वासुकी इंडिकस हा आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या सर्वात मोठ्या सापांपैकी एक असल्याचे मानले जात आहे. या संदर्भातील संशोधन ‘नेचर’ या संशोधन पत्रिकेत प्रकाशित करण्यात आलेले आहे. या संशोधनात म्हटल्याप्रमाणे हा अतिभव्य नाग ४७ दशलक्ष वर्षांपूर्वी इओसीन या कालखंडात अस्तित्त्वात होता. हा नाग संथ गतीने फिरणारा, हल्ला करणारा शिकारी होता, याने आपल्या भक्ष्याला पिळवटून मारले असे संशोधनात सिद्ध झाले आहे. या विषयावर सखोल संशोधक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुरकी (उत्तराखंड) येथील देबजित दत्ता आणि सुनील बाजपेयी या दोन संशोधकांनी केले आहे.
वासुकी इंडिकसची गाथा २००५ साली सुरू झाली. सुरुवातीच्या कालखंडात गुजरात येथे सापडलेल्या जीवाश्मांची ओळख मगरीसारख्या प्राण्याशी करण्यात आली होती. २०२३ साली हे अवशेष भल्यामोठ्या नागाचे असल्याचे उघड झाले. त्यानंतर झालेल्या संशोधनात या प्राण्याचा आकार, निवासस्थान, वर्तन यांचा शोध घेण्यात आला. ज्यात या प्राण्याचे आकारमान हे त्याचे वैशिष्ट्य ठरले.
देबजित दत्ता आणि जीवाश्मविज्ञानाचे प्राध्यापक सुनील बाजपेयी यांनी सीएनएनला दिलेल्या माहितीप्रमाणे या नागाच्या भव्य आकारमानामागे अनेक कारणे आहेत. ज्यात भरपूर अन्न संसाधने असलेल्या अनुकूल वातावरणापासून ते नैसर्गिक भक्षकांचा अभाव इत्यादींचा समावेश होतो. किंवा त्यामागे उबदार हवामान कारणीभूत असण्याचीही शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
संशोधकांनी सापाची लांबी १०.९ मीटर (३६ फूट) ते १५.२ मीटर (५० फूट) असल्याचे सांगितले. तर या नागाचे शरीर विस्तृत आणि दंडगोलाकार होते. दत्त आणि बाजपेयींना यांनी सांगितले की, वासुकी इंडिकस पाण्याऐवजी जमिनीवर राहत असावा. आपल्या आकारमानामुळे तो झाडावर चढण्यास असमर्थ होता. असे असले तरी हा आकार उपलब्ध अवशेषांवरून अंदाजाने व्यक्त करण्यात आला आहे, कारण अभ्यासकांकडे या सापाच्या सांगाड्याचे पूर्ण अवशेष उपलब्ध नाहीत.
