उष्माघात कसा टाळावा
लक्षणे दिसत असल्यास काय काळजी घ्यावी?
मुंबई
महाराष्ट्रात सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे राज्यात अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.उष्माघातामुळे त्रास होऊ शकतो, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आलं आहे.कडाक्याच्या उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात किंवा ज्याला सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक असंही म्हटलं जातं.
बाहेरचं तापमान खूप वाढलं की शरीरातील थर्मोरेग्यूलेशन बिघडतं, शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे उष्माघातामुळे मृत्यू होऊ शकतो यापूर्वीही महाराष्ट्रासह देशभरात उष्माघातामुळे नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात विशेषत: नागपूर, मराठवाडा या भागात उष्माघातामुळे दरवर्षी मृत्यूच्या घटना घडतात.
उष्माघाताची लक्षणं
चक्कर येणं, उल्ट्या होणं, मळमळ होणं.
शरीराचं तापमान जास्त वाढणं.
पोटात कळ येणं.
शरीरातील पाणी कमी होणं.
ही लक्षणं आढळल्यास किंवा एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास काय काळजी घ्यावी
तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
दरम्यानच्या काळात, त्याला थंड, सावलीच्या ठिकाणी झोपवावं.
ओल्या कपड्याने त्याचं शरीर पुसून घ्यावं.
त्याच्या डोक्यावर साधं पाणी टाकत राहावं.
एकंदरीत त्याच्या शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा.
त्या व्यक्तीला लिंबू सरबत द्या.
उष्माघात कसा ओळखावा?
उष्माघातात प्रौढांमध्ये शरीराचे तापमान १०४ फॅरनहाईटपर्यंत (४० डिग्री सेल्सिअस) पोहोचल्यास, तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, ह्रदयाचे ठोके वाढणे, धडधडणे ही लक्षणे दिसतात.लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, तोंडाची त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसतात.
असा करा उकाड्यापासून बचाव?
उन्हात गेल्यास डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी
दुपारी १२ ते सायं. ४ वाजेपर्यंत शक्यतो घरात थांबा
पांढरे, सौम्य रंगाचे, सैलसर कपडे वापरा, थेट येणारा सूर्यप्रकाश, ऊन टाळा.
पुरेसे पाणी प्या, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्या.
उन्हात चप्पल न घालता- अनवाणी चालू नये, चहा, कॉफी इत्यादी गरम पेय टाळावीत
