सूर्यग्रहण म्हणजे काय?
गैरसमज बाजूला करून घ्या शास्त्रीय घटनेचा आनंद
नवी दिल्ली
8 एप्रिलला होणाऱ्या सूर्यग्रहणाबद्दल जगभरात उत्सुकता आहे. उत्तर अमेरिकेच्या ज्या भागात खग्रास ग्रहण स्थिती दिसेल तिथे तब्बल 4 मिनिटं 9 सेकंदांसाठी भरदिवसा अंधार होईल.यापूर्वीच्या खग्रास ग्रहणांपेक्षा हा काळ खूप मोठा आहे.8 एप्रिलला उत्तर अमेरिका खंडात ग्रहण लागायला सुरुवात होईल तेव्हा लाखो लोकांना ते पाहता आणि अनुभवता येईल कारण यावेळी ग्रहण ज्या पट्ट्यात दिसणार आहे तो पट्टा प्रचंड लोकवस्तीचा आहे. मेक्सिकोचा काही भाग – अमेरिका आणि कॅनडात मिळून तब्बल 3.1 कोटी लोक हे ग्रहण पाहतील असा अंदाज आहे.
अमावस्येला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो. म्हणजे सूर्याला ग्रहण लागतं. ग्रहणं तीन प्रकारची असतात. खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती.ग्रहणाच्या स्थितीत सूर्य, चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर किती आहे? ते नेमके सरळ रेषेत आहेत का? आणि तुम्ही पृथ्वीवर नेमके कुठे आहात? या तीन गोष्टींवर ग्रहणाचा प्रकार अवलंबून असतो.पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण होतं. चंद्रामुळे सूर्याकडून येणारा प्रकाश अडतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. याला सूर्य ग्रहण स्थिती म्हणतात.चंद्र किती प्रमाणात सूर्याचा प्रकाश अडवतो यावरून ग्रहणाची खग्रास, खंडग्रास वा कंकणाकृती स्थिती दिसते.
पृथ्वीवरून पाहताना सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्याला ‘खग्रास सूर्यग्रहण’ असं म्हणतात.एरवी चंद्र सूर्यापेक्षा, अगदी पृथ्वीपेक्षाही खूपच लहान आहे. पण तो पृथ्वीपासून जवळ आहे. त्यामुळं त्यामुळं पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य आणि चंद्र आकारानं एकसारखे दिसतात. आणि म्हणूनच खग्रास स्थितीत चंद्राचं बिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकतं.
सूर्याचा केवळ काही भाग झाकलेला दिसतो, त्याला ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ असं म्हणतात.
पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षा काहीशा लंबगोलाकार आहेत. चंद्र या कक्षेत पृथ्वीपासून दूरच्या बिंदूजवळ असतो, अशा वेळी पृथ्वीवरून चंद्रबिंबाचा आकार सूर्यबिंबापेक्षा लहान दिसतो.याचदरम्यान जेव्हा सूर्यग्रहण होतं, तेव्हा चंद्र सूर्यबिंबाच्या मधोमध येतो; पण सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही, तर एखाद्या कंकणासारखी म्हणजे बांगडीसारखी सूर्याची कडा दिसून येते. त्यालाच ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात.
ग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यावी?
ग्रहण पाहताना कधीही सूर्याकडे थेट पाहू नका. कारण सूर्याच्या तीव्र कीरणांमुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.ग्रहण पाहण्यासाठीचे खास फिल्टर लावलेले चष्मे घालूनच ग्रहण पाहावे. पिनहोल कॅमेरा, घरातली चाळणी किंवा सौर दुर्बिणीच्या माध्यमातून सूर्याचं प्रतिबिंब एखाद्या पडद्यावर पाडून ग्रहणाची स्थिती पाहता येते.
ग्रहणाविषयी आपल्याकडे खूप गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. राहू- केतू हे राक्षस सूर्याला गिळतात म्हणून सूर्यग्रहण होतं असं लोकांना वाटायचं. ग्रहणात हवा, पाणी अन्नपदार्थ दूषित होतात असा एक मोठा गैरसमज होता. त्यामुळं पूर्वी ग्रहण सुटल्यावर लोक आंघोळ करीत असत, साठवलेले सर्व पाणी ओतून टाकीत व नव्याने पाणी भरत असत.पण अशा प्रथा चुकीच्या असल्याचं खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण सांगतात, “ग्रहण सुटले म्हणून आंघोळ करण्याची काहीही आवश्यकता नाही.कारण ग्रहणात काहीही अशुद्ध होत नाही. ग्रहणात जेवू नये, ग्रहणात झोपू नये, ग्रहणात मलमूत्र विसर्जन करू नये असेही सांगितले जाते.”परंतु त्यात काहीही तथ्य नाही. काही लोक मला प्रश्न विचारतात की, आमच्या राशीला हे ग्रहण कसे आहे? मी त्यांना सांगतो, की जे लोक ग्रहण पाहतील, त्यामागचे वैज्ञानिक कारण समजून घेतील त्यांच्या राशीला हे ग्रहण शुभ आहे
